मुंबई : पर्यटकांचे आकर्षण असलेला पवई तलाव गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे. तलावात जलपर्णी, गाळ आणि सांडपाण्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. ही बाब लक्षात घेऊन पवई तलावाला रामसर दर्जा द्यावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी, तसेच स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

पवई तलाव विविध पक्ष्यांचा अधिवास आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे, ज्यात काही दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींचाही समावेश आहे. ओरिएंटल डार्टर आणि ब्लॅक-हेडेड आयबिस आदींचा त्यात समावेश आहे. याचबरोबर तलावात मगरींचा अधिवास आहे. अनेकदा मगरी तलावाच्या काही भागांत सहजपणे दिसतात. तसेच आयआयटी मुबंई परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेकदा मगरी विहार करताना आढळतात. विशेषतः पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते तेव्हा मगरी तलावाबाहेर येतानाही दिसतात. दरम्यान, पवई तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येते.

तसेच तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी फोफावली आहे. त्यामुळे मगरी आणि अन्य जलचरांना धोका निर्माण होत असल्याची तक्रारही यापूर्वी करण्यात आली होती. २१० हेक्टरमध्ये पसरलेले, ६०० हेक्टर पाणलोट क्षेत्र असलेल्या पवई तलावाला पर्यावरणीय महत्त्व आहे. मात्र असे असतानाही या तलावाला प्रदूषणाने वेढले आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी, तसेच स्थानिक नागरिकांकडून तलावाला रामसर दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

रामसर स्थळाचा दर्जामुळे पवई तलावासाठी संरक्षण मिळू शकेल. ही मागणी मंजूर झाल्यास ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यानंतर पवई हे मुंबईचे दुसरे रामसर स्थळ असेल, असे मोहिमेचे नेतृत्व करणारे पर्यावरणप्रेमी आणि नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. दरम्यान, पवई तलावाबाबत डॉ. राकेश बक्षी यांनी दाखल केलेल्या याचिकेची राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) चौकशी करीत आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

महापालिकेकडून जलपर्णी काढण्याचे काम

पवई जलप्रदूषणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. याअंतर्गत तलावातील जलपर्णी काढण्याचे काम पालिकेने हती घेतले होते. २३ मे ते १ जून या दहा दिवसांच्या कालावधीत १ हजार ४५० मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढण्यात आली होती.

मगरींचे सर्वेक्षण

पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचा अधिवास असून अधूनमधून मगरी तलावाबाहेर येऊन मुक्तसंचार करताना दिसतात. यामुळे तलावातील मगरींचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणीही यापूर्वी करण्यात आली आहे.

रामसर हा दर्जा केवळ सन्माननीय पद नाही. रामसर दर्जा पाणथळ जागांचे वैज्ञानिकदृष्ट्या व्यवस्थापन करण्यासाठी, खराब झालेल्या परिसंस्था पुनर्संचयित करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांचे जतन करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. – मृगांक प्रभू, वरिष्ठ शास्त्रज्ञ, सृष्टी संवर्धन फाउंडेशन

नागरी संस्था तलावाचे पर्यावरणीय आरोग्य पुर्संचयित करण्यासाठी जलदगतीने कार्य करेल अशी आशा आहे. रामसर दर्जा मिळाला तर पवई तलावासाठी ही एक महत्त्वाची सुरक्षा ठरेल. – पामेला जीमा, अध्यक्ष, प्रगत स्थानिक व्यवस्थापन समिती