मुंबई : संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. गेले दोन – तीन दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला. मागील दोन तीन दिवसांच्या तुलनेत बुधवारी राज्यात पावसाचा जोर कमी होता. काही ठराविक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईत हलक्या सरींची शक्यता आहे, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेले दोन – तीन दिवस मोसमी पावसाने संपूर्ण राज्यात हजेरी लावली. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. संपूर्ण राज्यात शनिवारपासून सक्रिय झालेल्या पावसाचा जोर मंगळवारपर्यंत कायम होता. त्यानंतर बुधवारी पावसाचा जोर ओसरला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले.

परिणामी, रविवारपासून राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर आता विदर्भावरील कमी दाबाचे क्षेत्र विरले असून सध्या मराठवाड्यावर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या कालावधीत पावसाची फारशी शक्यता नाही. ढगांचा गडगडाट मात्र काही प्रमाणात असू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत पावसाची विश्रांती

मुंबईत मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शहर, तसेच उपनगरात मंगळवारी हलक्या सरी बरसल्या, त्यानंतर फारसा पाऊस पडलेला नाही. तसेच पुढील दोन – तीन दिवस मुंबईत पावसाची फारशी शक्यताही नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे . हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी २९.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३०.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मागील दोन – तीन दिवस मुंबईचे तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदले जात होते.

शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी

राज्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसतील. तर काही ठिकाणी अधूनमधून पाऊस कोसळेल. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने सांगितले. त्यामुळे संपूर्ण राज्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरणार आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून. मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी आणखी काही भागातून माघार घेतली आहे.