मुंबई: पावसाच्या आगमनासोबतच सरीसृपांचे दर्शन वाढू लागले असताना ठाणे शहरात दुर्मिळ आणि विशिष्ट रंगछटेचा खापरखवल्या साप आढळला असून या खापरखवल्या सापाविषयी निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सह्याद्रीच्या कुशीत आढळणाऱ्या या सापाचे अनेक उपप्रकार असून, यातील काही प्रजाती फारच दुर्मिळ आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाणे परिसरात एका खडकाळ भागातून जात असताना स्थानिक निसर्गप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकार करण सोलंकी आणि साहिल सावडिया यांना हा साप दिसला. सापाची रंगछटा काळसर असून त्यावर तपकिरी रंगाचा पट्टा होता. सुरुवातीला त्याची ओळख पटवणे कठीण होते. स्थानिक सर्पतज्ज्ञ आणि संशोधकांनी तपासणी करून हा खापरखवल्या साप असल्याचे सांगितले.

खापरखवल्या साप हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रामुख्याने ही प्रजाती महाराष्ट्रातील पश्चिम घाटात आढळते. शरीर लांबट आणि नाजूक असते. रंग प्रामुख्याने काळसर, तपकिरी किंवा गर्द राखाडी, पण अनेक वेळा त्यावर पांढऱ्या किंवा पिवळसर ठिपके असतात. ठाण्यात आढळलेल्या सापाची रंगछटा भिन्न होती. या सापाच्या त्वचेवर खवले असतात. ते त्याला एक खापराच्या कड्यासारखा खवलेदार पोत देतात म्हणूनच त्याला ‘खापरखवल्या’ म्हटले जाते. शेपटी आखूड, चपटसर आणि टोकाला ढालासारखा टणक भाग असतो. शेपटी मातीमध्ये उत्खनन करताना उपयोगी पडते. त्यामुळे याला ‘शेल्डटेल’ असेही संबोधिले जाते. हा साप जमिनीमध्ये राहतो. बहुतांश वेळ ते जमिनीखाली दडून राहतात. मुख्यतः ते पावसाळ्यात बाहेर येत असल्याने दृष्टीस पडतात. प्रामुख्याने सह्याद्री, सातारा, पुणे, ठाणे, आणि काही वेळा मुंबईच्या उपनगरात ते आढळतात. कोकण, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या पश्चिम घाटात तपकिरीसर, जांभळट किंवा निळसर छटा असलेल्या खापरखवल्या सापांटी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे काही प्रजातींचा रंग हा जमिनीच्या प्रकारानुसार (उदा. काळी माती, लाल माती) थोड्या फार प्रमाणात बदललेले दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशिष्ट्ये

  • हा साप पूर्णतः बिनविषारी आहे. माणसाला कोणतीही हानी पोहोचवत नाही.
  • मुख्यतः कीटक आणि जमिनीतील अळ्या हा त्याचा आहार आहे.
  • या सापाच्या काही प्रजाती दुर्मिळ असून त्यांची फारशी नोंद आढळत नाही. त्यामुळे एखादा वेगळ्या रंगछटेचा नमुना सापडला, तर तो शास्त्रीयदृष्ट्या नव्या माहितीचा स्रोत ठरतो.

संशोधन आणि संवर्धन महत्त्व

  • या प्रजातीच्या सापांवर अद्याप हवे तसे संशोधन झालेले नाही.
  • त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • ही प्रजाती जैवविविधतेसाठी उपयोगी आहे.

हा साप खापरखवल्या (बॉम्बे शील्डटेल) प्रजातीचा आहे, फक्त याची संरचना आणि त्वचेवरील रचना थोडी वेगळी आहे, म्हणूनच हा साप दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. – नवीन सोलंकी ,सर्प मित्र, संस्थापक, आशा द होप फॉर एनिमल्स वेल्फर ट्रस्ट