मुंबई : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पात चुकीचे नियोजन सुरू असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येईल, अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी घेतली. तसेच ‘नैना’ने गावठाणे वगळून विकास आराखडा तयार करावा आणि नोंदणी महानिरीक्षकांनी अधिकृत बांधकामांची नोंदणी करावी, असे आदेशही बावनकुळे यांनी दिले.
पनवेलमधील बहुचर्चित नैना प्रकल्पातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील ‘सिडको’च्या नकारात्मक भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत बावनकुळे यांनी अनेक सूचना दिल्या. आमदार विक्रांत पाटील यांच्यासह अनेक स्थानिक प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि ‘सिडको’चे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
सिडकोने ‘नैना’ प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेतली आहे. मात्र विकासाची कोणतीही कामे होत नाहीत. सर्व प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. सिडकोच्या नकारात्मक मानसिकतेमुळे लाखो नागरिकांचे नुकसान होत आहे. विकासाच्या नावाने केवळ जागा अडवून ठेवल्या जात आहेत, अशी तक्रार आमदार पाटील यांनी बैठकीत केली. त्याची गंभीर दखल घेऊन बावनकुळे यांनी सिडको व नैनाच्या अधिकाऱ्यांना काही निर्देश दिले.
ज्या गावठाणांना ‘नैना’ने नगररचनेतून (टाऊन प्लॅनिंग) वगळले आहे, त्यांची नोंदणी त्वरित सुरू करावी. चुकीचा अहवाल दिल्यास नैना जबाबदार असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातून ग्रामपंचायतीची गावठाणे तत्काळ वगळण्याचे आदेशही देण्यात आले. वगळलेल्या भागांची नोंदणी ‘जीपीएस’द्वारे त्वरित सुरू करावी. ‘बी-झोन’मध्ये जी बांधकामे झाली आहेत, ती नैनाने तपासून १५ दिवसांत अहवाल सादर करावा. हा अहवाल आल्यानंतर बांधकाम परवानग्या आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी २०१३ पासून ११३ परवानग्या दिल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही सिडकोने जागा अडवून ठेवली आहे, असे त्यांनी नमूद केले. सिडकोच्या चुकीच्या नियोजनावर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आयोजित करुन चुकीचे नियोजनासंदर्भात आवश्यक निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.