मुंबई : अभिनेत्री रिमी सेन व तिचा व्यावसायिक भागिदार, चित्रपट निर्माता सुभ्रत रे यांचा विश्वास संपादन करून साडेतीन कोटी रुपयांंची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी मालाड येथील रहिवासी असून त्यांनी कूट चलनात गुंतवणूकीतून महिन्याला ८ ते १० टक्के परतावा देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चित्रपट निर्माता निभ्रत रे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री रिमी सेन हिने हंगामा, धूम, हेराफेरी, गोलमाल सारख्या चित्रपटांत काम केले आहे. तक्रारनुसार, निभ्रत रे व त्यांची मैत्रिण रिमी सेन यांची मामोलो फिल्म नावाची कंपनी आहे. रिमी सेने हिची २०१३ मध्ये आरोपीशी ओळख झाली. त्याने बक्षीस समारंभात तिला बोलावले होते.
रिमी मार्फत सुभ्रत यांचीही आरोपी व्यावसायिकाशी ओळख झाली. त्याने त्याचा मुलगा व मुलगी कूट चलनात गुंतवणूकीतून चांगला नफा कमवून देत असल्याचे सांगितले. त्यांनी कार्यालयात नेऊन गुंतवणूकीबाबतची माहिती दिली. आरोपीने महिन्याला ८ ते १० टक्के नफा कमवून देण्याचे आमीष दाखवले. त्यानुसार सुभ्रत रेने २०२० मध्ये आरोपीने सांगितलेल्या खात्यावर २० लाख रुपये जमा केले. त्यानंतर जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत मामोलो फिल्मच्या खात्यातून एक कोटी तीन लाख जमा करण्यात आले.
विविध व्यवहाराद्वार त्यांनी एकूम तीन कोटी ५८ लाख रुपये आरोपीने सांगितल्याप्रमाणे जमा केली. त्याद्वारे चार लाख ४७ हजार अमेरिकन डॉलर्स मूल्याच्या कूट चलनात आरोपींनी व्यवहार करण्यास सुरूवात केला. ती रक्कम सात लाख ३५ हजार अमेरिकन डॉल्रस झाली. त्यावेळी रे यांनी त्यातील गुंतवलेले चाल लाख ४७ हजार अमेरिकन डॉलर्स काढून उर्वरीत रक्कमेचे ट्रेडींग करण्यास सांगितले. पण आरोपीने नकार दिला. ती रक्कम लवकरच १० लाख अमेरिकन डॉलर्स होईल, असे त्यांना सांगण्यात आले.
आरोपीने ठरल्याप्रमाणे नफ्यावर १० टक्के रक्कम म्हणजे १३ लाख ५० हजार रुपये कापून घेतले. त्यानंतर या व्यवहारांमध्ये तोटा होऊ लागला. दिवसेंदिवस हा तोटा वाढला व त्यांच्याकडे केवळ ४८ हजार अमेरिकन डॉलर्सच राहिले. त्यानंतर त्यांनी वारंवार संपर्क केला असता त्यांनी त्यांचे कूट चलनाचे खाते हाताळणे बंद केल्याचे सांगितले. त्यानंतर निभ्रत रे यांनी याप्रकरणी खार पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी मालाड येथील व्यावसायिक, त्याचा मुलगा व मुलगी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.