मुंबई : अभिनेता सलमान खानचे हस्ताक्षर सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाले असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. सलमान खानचे अक्षर डॉक्टरांपेक्षा वाईट असल्याची चर्चा सुरू आहे. वांद्रे येथील लकी रेस्तराँला ८७ वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने रेस्तराँने काही छायाचित्रे प्रसिध्द केली होती. त्यात सलमान खानने स्वहस्ताक्षरात दिलेला अभिप्रायाच्या छायाचित्राचा समावेश आहे.
वांद्रे पश्चिमेला सय्यद अली अकबर यांनी ९ सप्टेंबर १९३८ रोजी लकी रेस्तरॉॅ सुरू केले. त्यांचा मुलगा सय्यद सफर अली हुसैनी हे या रेस्तराँचे मालक आहेत. अकबर यांचे नातू व सय्यद सफर अली हुसैनी यांचे पुत्र तिसऱ्या पिढीतील एस. मोहसीन (५७) कुटुंबाची परंपरा चालवत आहेत. ज्या ठिकाणी आमचे रेस्तराँ आहे, त्या चौकाला मोहम्मद रफी चौक असे नाव दिले आहे. परंतु, रेस्तराँमुळे आता हा चौक लकी जंक्शन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या रेस्तराँला यंदा ८७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने रेस्तरॉंला खास पध्दतीने सजविण्यात आले होते. रेस्तराँ संदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. जुनी – नवी छायाचित्रे प्रसिध्द करण्यात येत आहेत.
सेलिब्रेटींचे अभिप्राय स्वहस्ताक्षरात
या रेस्तराँमध्ये अनेक सेलिब्रेटी, अभिनेते क्रिकेटपटू, नामांकित व्यक्ती येत असत. त्यांचा अभिप्राय लिहून ठेवला जायचा. यातील निवडक अभिप्राय रेस्तराँने काचेची फ्रेम करून आतमध्ये लावला आहे. त्यात क्रिकेटपटू महेंद्र धोनी, विराट कोहलीपासून अभिनेता सलमान खानपर्यंत विविध सेलिब्रेंटीच्या अभिप्रायांचा समावेश आहे. हे सर्व अभिप्राय स्वहस्ताक्षरात आहेत. रेस्तराँमध्ये येणारे ग्राहक आवर्जून सेलिब्रेंटीचे अभिप्राय वाचत आहेत.
सलमानखानचे हस्ताक्षर सर्वात खराब
यापैकी एक अभिप्राय लेखक-पटकथाकार सलीम अली, अभिनेता सलमान खान, अभिनेता अरबाझ खान या खान कुटुंबियांनी लिहिलेला आहे. मात्र यातील अभिनेता सलमान खानचे अक्षर सध्या चर्चेत आले असून समाजमाध्यमावर ट्रोल होत आहे. सलमान खानचे हस्ताक्षर अतिशय गचाळ आणि समजायला कठीण आहे. त्यामुळे त्याच्या हस्तातक्षराची खिल्ली उडवली जात आहे. ‘लकी हॉटेलच्या मेन्यू कार्डपेक्षा सलमानेचे हस्ताक्षर वाचायल जास्त वेळ जातो’ असे एका युजरने म्हटले आहे. ‘हे अक्षर वाचणे म्हणजे बिर्याणीत हाडे शोधण्यासारखे आहे’, असे एकाने म्हटले आहे. ‘सलमान खानच्या सिनेमाचे क्लायमेक्स कधी समजत नाही… आणि अक्षरपण तसेच आहे’, अशी टिप्पणी एकाने केली आहे. ‘हे अक्षर वाचून डोळ्याना नंबर नाही आला तरच नवल’ असे एकाने सुनावले आहे.
डॉक्टरांचे अक्षर समजेल पण सलमानचं नाही
यात चर्चेत आता डॉक्टरांनीही उडी घेतली आहे. डॉक्टर औषधासाठी चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) लिहून देतात. त्यावरील डॉक्टरांचं अक्षर हा नेमही चेष्टेचा विषय असतो. कारण ते लवकर कुणाला समजत नाही. पण ‘आमच्या हस्ताक्षरापेक्षा सलमान खानचं अक्षर वाईट आहे. डॉक्टरचं अक्षर समजेल पण या ॲक्टरचं अक्षर समजणार नाही’, असे खुद्द एका डॉक्टरनेच आपल्या कमेंट मध्ये म्हटलं आहे.