मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी माझगाव न्यायालयात उपस्थिती लावली. तसेच, त्यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन करून निर्दोष असल्याचा दावा केला. परंतु त्यांच्याविरोधात आता मानहानीचा फौजदारी खटला चालणार आहे.
भांडुप येथे १५ जानेवारी २०२३ रोजी आयोजित कोकण महोत्सवात बोलताना, मतदार यादीत संजय राऊत यांचे नाव नव्हते आणि आपण शिवसेनेत असताना राऊत यांना राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली होती, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. त्यानंतर, हेतुतः आणि खोटी टिप्पणी करून आपली बदनामी केल्याचा दावा करून राऊत यांनी राणे यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा मानहानीचा खटला दाखल केला.
माझगाव येथील दंडाधिकारी न्यायालयाने एप्रिलमध्ये राणे यांना समन्स बजावले होते. राणे यांनी सार्वजनिक मेळाव्यात राऊत यांच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने केली होती आणि ती माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे तक्रारदाराची प्रतिष्ठा मलिन झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत असल्याचे नमूद करून दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना समन्स बजावले होते.
समन्सला राणे यांनी खासदार आणि आमदारांविरुद्धच्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच आपल्याविरुद्ध कोणताही मानहानीचा खटला तयार होत नसल्याचा व कोणतेही कारण न देता दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावल्याचा दावा केला होता. तथापि, त्यांचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला होता.
त्यानंतर राणे हे वकिलासह सोमवारी माझगाव न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांच्यासमोर उपस्थित झाले. या वेळी त्यांना आरोप वाचून दाखवण्यात आले असता, राणेंनी त्यांचे खडंन केले व निर्दोष असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, साक्षीदारांच्या तपासणीसाठी खटल्याची सुनावणी न्यायालयाने ११ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.