सिनेअभिनेत्री अलका पुणेवार यांचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली असून त्यांच्यामार्फत तपास सुरू केला आहे. याशिवाय ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची पथकेही या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करीत आहेत. तसेच या प्रकरणी अपहरणाचा कट रचल्याचा गुन्हा अनोळखी व्यक्तींविरोधात दाखल करण्याची तयारीही पोलिसांनी सुरू केली आहे. या वृत्तास वागळे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
उरण येथील एका स्टेज शो करीता २७ डिसेंबरला ठाणे येथून गेलेल्या अलका पुणेवार या बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात नोंद आहे. तसेच मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली जोड रस्त्याजवळील खोल दरीत अलका यांची मारूती कार पोलिसांना सापडली होती.
मात्र, त्यात कोणीच नव्हते. घटनास्थळापासून ५० फूट अंतरावर गाडीचे कागदपत्र आणि त्यांचा मोबाईल सापडला आहे. मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड होते. त्यापैकी एक सिम आणि मेमरी कार्ड मोबाईलमध्ये नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. असे असले तरी, अलका यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी ठाणे पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली आहेत. मोबाईल, कॉल डिटेल्स यासंबंधीचा तांत्रिक बाबी, अलका पुणेवार यांच्या कामासंबंधीची माहिती, घटनास्थळ आणि तेथील सी सी टिव्ही कॅमेऱ्यांची माहिती, या प्रकरणातील संशयितांची चौकशी, आदी दिशेने चार टिमने तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.