मुंबई : मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी कामे आणि देखभालीसाठी रविवारी दिवसा ब्लॉक घेतला जाईल. तर, पश्चिम रेल्वेवरील कामे शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेऊन केली जाणार आहेत.

कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार

मध्य रेल्वे – मुख्य मार्ग

कुठे : ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन रेल्वेगाड्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी/दादर येथे येणार्‍या अप रेल्वेगाड्या कल्याण ते ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा – मंजूर निधीच्या वापराअभावी आरोग्य सेवेला फटका; उच्च न्यायालयाचे सरकारच्या कृतीवर बोट

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द असतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी विशेष लोकल चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

हेही वाचा – बांगलादेशातून मुंबईत अवघ्या वीस हजार रुपयांत, बांगलादेशींसाठी हवाला रॅकेट चालवणाऱ्याला अटक

पश्चिम रेल्वे

कुठे : मुंबई सेंट्रल ते माहीम

कधी : शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत (चार तासांचा ब्लॉक)

परिणाम : ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील जलद मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या सांताक्रूझ ते चर्चगेट दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.