मुंबई : राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाणेस्थित येऊरच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात बांधण्यात आलेली टर्फ मैदाने पाडण्यात आल्याचा अथवा बंद केल्याचा ठाणे महानगरपालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे केलेला दावा चुकीचा आहे. याउलट नऊपैकी चार टर्फ मैदाने अद्यापही सुरू आहेत, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.

याचिकाकर्त्यांच्या दाव्याचे ठाणे महापालिकेच्या वतीने खंडन करण्यात आले. तसेच नऊ पैकी दोन टर्फ मैदाने पाडण्यात आली आणि उर्वरित बंद असल्याचा प्रतिदावा करण्यात आला. त्याचप्रमाणे, याचिकाकर्त्यांनी केलेल्या दाव्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी वेळ देण्याची विनंतीही ठाणे महापालिकेने केली. ती मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने मान्य केली. त्याचवेळी, याचिकाकर्त्यांनीही त्यांचे म्हणणे छायाचित्रांसह प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

तत्पूर्वी, राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असलेल्या वन जमिनीवर उभारण्यात आलेली टर्फ मैदाने अद्यापही सुरू असल्याची छायाचित्रे याचिकाकर्ते रोहित जोशी यांच्या वतीने वरिष्ठ वकील गायत्री सिंह यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर नऊ पैकी दोन टर्फ मैदाने पाडण्यात आल्याचा आणि उवर्रित बंद असल्याचे आधीच प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने वकील मंदार लिमये यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच सर्व टर्फ मालकांना नोटीस बजावण्यात आली असून टर्फ मैदानाचा पाणी आणि वीज पुरवठा बंद करण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

…तर टर्फ मैदाने बंद करण्याची कारवाई करा

टर्फची मैदाने अवैध असतील, तर ती बंद केली पाहिजेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे न्यायालयाने ठाणे महापालिकेला सुनावले. तर, ठाणे महापालिका आणि वन विभाग टर्फची मैदाने अवैध असल्याचे प्रतिज्ञापत्रावर सांगतात. परंतु, त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत, तिथे झोपडपट्टी असती, तर तातडीने पाडकाम कारवाई आली असती. परंतु, ही उच्चभ्रूंची टर्फ मैदाने उभी आहेत, त्या मैदानांवर प्रखर दिवे लावून, डिजेच्या कर्णकर्कश आवाजात धिंगाणा सुरू असूनही कारवाई होत नाही, असे सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन ही टर्फ मैदाने सुरू असल्यास त्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय ?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १०३.८४ चौ. किलोमीटर मध्ये पसरले आहे. याच उद्यानाचा भाग असलेला ठाण्यातील येऊर परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून पर्यावरण, वन व हवा बदल मंत्रालयाने घोषित केले आहे. शून्य ते तीन किलोमीटर परिसरात कोणतेही हॉटेल, रिसॉर्ट उभारण्यास मनाई असूनही येऊरमध्ये ५० विविध अनधिकृत बांधकामे ५ टर्फ मैदाने (पीच टर्फ क्लब, गुलुकुल क्रिकेट ॲकॅडमी, रंगोळी क्रिकेट फुटबॉल टर्फ १ व २ आणि विकिंग्स टर्फ) हॉटेल, बार, रिसॉर्ट उभारली आहेत. टर्फ मैदानांवर मोठे दिवे लावून रात्रंदिवस खेळण्यासाठी तासानुसार पैसे मोजावे लागतात. मात्र, मोठे दिवे आणि गोंगाटामुळे वन्यजीव विचलित होत असल्याचा दावा याचिकेत केला होता.