मुंबई : काही दिवसांपूर्वी बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आणखी एका वाघाटीच्या पिल्लाचा मृत्यू झाला. या पिल्लाचा उंचावरून पडून मृत्यू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पिल्लाला संसर्गजन्य आजारही झाला होता. आता उद्यानातील प्रजनन केंद्रात वाघाटीची ११ पैकी ३ पिल्ले शिल्लक आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वाघाटी प्रजनन प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. राज्यात विविध भागात सापडणारी वाघाटीची पिल्ले राष्ट्रीय उद्यानातील प्रजनन केंद्रात आणण्यात येतात. त्यांचे संगोपन राष्ट्रीय उद्यानातील प्रजनन केंद्रात करण्यात येते. कोल्हापूरमध्ये फेब्रुवारी महिन्यात सापडलेली वाघाटीची पिल्ले राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आली होती. ही पिल्ले अगदी काही दिवसांची होती. पिल्लांना उद्यानात आणले तेव्हाच ती अशक्त आणि आजारी होती. त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. पहिले दोन महिने त्यांना आईच्या दुधाची गरज होती, मात्र पिल्ले आईपासून दुरावल्यामुळे ते शक्य झाले नाही. आईपासून दुरावल्यामुळे आणि आवश्यक पोषणमूल्ये न मिळाल्याने या सर्व पिल्लांना संसर्गजन्य आजार झाला होता. त्यामुळे यापैकी तीन पिल्लांचा मृत्यू काही दिवसांतच झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापैकी एक पिल्लू उपचारांना प्रतिसाद देत होते.

त्याच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी हे पिल्लू उंचावरून खाली पडल्याने त्याच्या कंबरेचा भाग फ्रॅक्चर झाला होता. तसेच अंतर्गत रक्तस्त्रावही झाला होता. या सर्व बाबींमुळे पिल्लाचा मृत्यू झाला. ही पिल्ले फेब्रुवारीमध्ये कोल्हापूरमधील एका गावातील शेतात ऊसतोड कामगारांना सापडली होती. प्रथमदर्शनी ती मांजरीची पिल्ले असल्याचे समजून ऊसतोड कामगारांनी त्यांना घरी नेले. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने वाघाटीची पिल्ले ताब्यात घेतली आणि ती जेथे सापडली तेथे ठेवली. पिल्ले व आईची भेट घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांची आई तेथे न आल्याने अखेर ती पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे सुपूर्द करण्यात आली.

उद्यानातील पिंजऱ्याची रचना बदलण्याचे आदेश

वाघाटी प्रजनन केंद्रातील पिंजऱ्याची रचना प्रौढ वाघाटींसाठी योग्य आहे. पिल्लांसाठी सध्या असलेल्या पिंजऱ्याची रचना अयोग्य आहे. त्यामुळे पिल्लांसाठी वेगळ्या रचनेचे पिंजरे तयार करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

वाघाटींच्या पिल्लांच्या मृत्यूची चौकशी करणार

यापूर्वी उद्यानातील प्रजनन केंद्रात वाघाटीच्या तीन पिल्लांचा संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाला होता. दोन पिल्लाचा मृत्यू उंचावरून पडल्यामुळे झाला होता. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ( वन्यजीव) उद्यान प्रशासनाला दिले आहेत.

१५ प्राजाती भारतात आढळतात

मांजर कुळातील प्राण्यांच्या एकूण १५ प्रजाती भारतात आढळतात. भारतातील एकूण मांजर कुळातील प्रजातींपैकी १० लहान प्रजाती आहेत. वाघाटी मुख्यतः उंदीर, घुशी अशा प्राण्यांची शिकार करतात. त्यामुळे पर्यावरण आणि अन्नसाखळीत ते महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतातील रान मांजरीनंतर सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती म्हणून वाघाटी ओळखली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम घाटात वास्तव्य

पश्चिम गाटातील काही भागात मर्यादित प्रमाणात हा प्राणी सापडतो. वाघाटीचा मानवी वस्ती जवळील जंगलात वावर असतो. आकार लहान असला तरी अत्यंत चपळ आणि अंधारात शिकार करण्यात तरबेज असलेला हा प्राणी आहे. वाघाटीच्या कपाळावर चार उभ्या रेषा असतात. मानेखालची बाजू पांढरी असते. तसेच डोळ्याभोवती पांढरी वर्तुळे असतात. पाठीवर करड्या रंगाचे ठिपके असतात. वाघाटीचे वजन सुमारे एक ते दीड किलो असते. निशाचर आणि लाजाळू असल्याने वाघाटी सहज दृष्टीस पडत नाही.