मुंबई : पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या परीरक्षणाचे काम चारऐवजी तीन दिवसांमध्ये पूर्ण करण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे पालिकेच्या जल विभागाने शुक्रवार, २७ मे रोजी जाहीर केलेली पाच टक्के पाणी कपात रद्द केली आहे. जल विभागाने वरील काम २४ मे रोजी हाती घेतले होते. हे काम २७ मे रोजी पूर्ण करण्यात येणार होते. त्यामुळे पालिकेच्या ए, बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी या विभागातील पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार होता. या कालावधीत काही भागात पाच टक्के पाणी कपात जाहीर करण्यात आली होती. मात्र पाजरापूर येथील १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राचे उप जलअभियंता प्रभाकर शिंदे, कार्यकारी अभियंता पल्लवी अटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंते आणि कामगारांनी वरील काम चारऐवजी तीन दिवसांत पूर्ण केले. त्यामुळे शुक्रवार, २७ रोजी होणारी ५ टक्के पाणी कपात रद्द करण्यात आल्याचे जलविभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.