लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचे संचालन आणि देखभाल दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (डीएमआरसी) केले जाण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) यासंबंधीच्या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. डीएमआरसी आणि फ्रान्सस्थित केओलिस कंपनीकडून निविदा सादर करण्यात आल्या असून यात डीएमआरसीची बोली सर्वात कमी असल्याने आता यासंबंधीचे कंत्राट डीएमआरसीला मिळण्याची शक्यता आहे.

एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असून ही मार्गिका आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकला नाही. आता मात्र एमएमआरसीने डिसेंबर २०२३ पर्यंत सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित दुसरा टप्पा जून २०२४ मध्ये सुरू करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. त्यामुळे आता एमएमआरसीने सर्व प्रकारच्या कामांना वेग दिला आहे. त्याचाच भाग म्हणून आता मेट्रो ३ चे संचालन आणि देखभालीसाठी कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा- मुंबई: म्हाडाच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामांना आता अटकाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निर्णयाप्रमाणे एमएमआरसीने २२ ऑक्टोबर २०२२ मध्ये यासाठी निविदा जारी केली होत्या. त्यानुसार डीएमआरसी आणि केओलिस या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. आता आर्थिक निविदा उघडण्यात आली असून यात डीएमआरसीने सर्वात कमी बोली लावली आहे. त्यामुळे आता हे कंत्राट डीएमआरसीला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका डीएमआरसीकडून चालविली जाणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान १० वर्षांसाठी कंत्राटदारावर मेट्रो ३ च्या संचालन आणि देखभालीची जबाबदारी असेल.