दोन वर्षांपासून मलमपट्टी व व्यायामाचे साहित्य नाही

सर्वाधिक कुष्ठरुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्य़ात नागपूरचा क्रमांक वरचा असतानाही येथील कुष्ठरुग्णांना  दोन वर्षांंपासून आवश्यक औषधांसह व्यायामाचे साहित्यही उपलब्ध झाले नाही. एक वर्षांंपासून आरोग्य विभागाला जनजागृती साहित्यही मिळाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्य़ात कुष्ठरुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून कुष्ठरोगावर नियंत्रणासाठी प्रत्येक वर्षी कोटय़वधींचा खर्च केला जातो. गांधी जयंती दिनी कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. नागपूर जिल्ह्य़ात मात्र, दुर्दैवाने वाईट स्थिती आहे. दोन वर्षांपासून रुग्णांना मलमपट्टी आणि व्यायामासाठी साहित्य खरेदी करण्यात आले नाही. यासाठी आलेली रक्कमही परत गेली आहे.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संवेदना कमी झालेल्या व विकृती आढळलेल्या प्रत्येक कुष्ठरुग्णांना व्यायामाचे विशिष्ट साहित्य दिले जाते तसेच जखमांवर लावण्यासाठी औषध दिले जाते, हे येथे उल्लेखनीय.

केंद्र सरकारकडून राज्याला त्यासाठी प्रत्येक वर्षी सुमारे ६० लाख रुपयांचा निधी मिळतो. शासन त्याचे प्रत्येक जिल्ह्य़ात रुग्णांच्या तुलनेत वाटप करते. नागपूर जिल्ह्य़ाच्या वाटय़ाला २.१५ लाख रुपये येते. मात्र, जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन सोसायटीकडून या साहित्यांची खरेदी झाली नाही. त्यामुळे वर्ष २०१६-१७ चा निधी परत गेला असून वर्ष २०१७-१८ चाही निधी परत जाण्याच्या वाटेवर आहे. या सोसायटीच्या अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तर सचिव सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) असतात. सोसायटीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा अंकेक्षण अधिकारी यांचाही समावेश असतो. या सर्व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. विशेष म्हणजे नागपूर वगळता राज्यातील इतर जिल्ह्य़ात साहित्य खरेदी झाली आहे. या प्रकाराने जिल्ह्य़ातील सुमारे ४०० ते ५०० कुष्ठरुग्णांना फटका बसला आहे.