गुन्हेगारीच्या पैशातून  सभागृह उभारले

नागपूर : कुख्यात गुंड रणजित सफेलकर याच्या कामठी परिसरातील ‘राजमहाल’ सभागृहाचे बांधकाम अनधिकृत असून उद्या बुधवारी त्याच्यावर उद्या बुलडोझर चालण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी पैशातून त्याने हे सभागृह उभारल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.

मनीष श्रीवास हत्याकांड प्रकरणात गुन्हेशाखा पोलिसांनी  सफेलकर, त्याचे साथीदार भरत हाटे कालू हाटे, इशाक मस्के, हेमंत गोरखा बाथो याला अटक केली आहे. सध्या सर्वजण गुन्हेशाखेच्या पोलीस कोठडीत आहेत. सफेलकर याने पाच कोटी रुपयांची सुपारी घेऊन वास्तुविशारद एकनाथ निमगडे यांची हत्या केल्याचेही समोर आले आहे. मात्र त्याला कोणी सुपारी दिली हे मात्र अद्यापही हायटेक गुन्हेशाखा पोलिसांना कळू शकले नाही. सफेलकर व त्याच्या टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जुनी कामठीतील खंडणी प्रकरणात सफेलकर तर मोक्का प्रकरणात त्याचे साथीदार गुन्हे शाखा पोलिसांच्या कोठडीत आहेत. सफेलकरविरुद्ध आतापर्यंत खून, खंडणी, बळजबरीने ताबा घेण्यासह चारपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. कालवा बुजवून त्याने राजमहालचे बांधकाम केले असून तो पूर्णपणे अनधिकृत आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रशासनाला पत्र लिहून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची विनंती केली. प्रशासनेही सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून उद्या बुधवारपासून राजमहालचे बांधकाम पाडण्याची तयारी केली असल्याची माहिती आहे.