राज्यभरात लवकरच अंमलबजावणी; मुंबई व नाशिकमध्ये पथदर्शी प्रयोग यशस्वी

वाहन चालवण्याच्या शिकाऊ परवाना घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात वारंवार खेटे घालावे लागणार नाही. परिवहन विभागाने महाविद्यालयातच तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई व नाशिकला ही योजना यशस्वी झाल्यावर आता राज्यभर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राज्यभरातील १५ प्रादेशिक, ३५ उपप्रादेशिक व इतर परिवहन विभागाच्या कार्यालयांत वाहन चालवण्याचा शिकाऊ व नियमित परवाना प्राप्त करण्यासाठी वाहनधारकांकडून गर्दी केली जाते. यासाठी सद्यस्थितीत असलेली प्रक्रिया वेळ खाऊन आणि खेटे घालण्यास बाध्य करणारी आहे.

प्रथम परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील अर्ज करणे, त्यानंतर ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी आरटीओ कार्यालय वा तालुका स्तरावर परीक्षेसाठी पर्याय द्यावा लागतो.

उमेदवार उत्तीर्ण झाल्यावर त्याला हा परवाना मिळतो.परिवहन विभागाने विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्याकरिता इंटरनेटची सोय असलेल्या महाविद्यालयातच शिकाऊ परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना संबंधित महाविद्यालयाच्या नावाचा पर्याय संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा लागेल. विद्यार्थ्यांनी तो निवडल्यावर त्याची चाचणी परीक्षा होईल व उत्तीर्ण झालेल्यांना परवाना दिला जाईल. डिजीटल सही असलेल्या परवान्यावर आरटीओचा मोनोग्राम असेल.

सध्या राज्यातील मुंबई व नाशिकच्या काही महाविद्यालयात हा पथदर्शी प्रयोग यशस्वी झाल्याचे मत, नाशिकचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर कळसकर यांनी व्यक्त केले.

कार्यालयांवरील ताण कमी होणार

नागपूरसह राज्यभरात वाहनांची संख्या वाढत असून त्यातुलनेत कर्मचारी कमी आहेत. महसूल देणाऱ्या या विभागात कर्मचाऱ्यांचीही पदे वाढवणे सोडा रिक्त पदेही शासन हव्या त्या प्रमाणात भरत नाही. त्यामुळे कामावरील कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना शिकाऊ परवाने देण्याचा कार्यालयावरील ताण कमी होईल. त्यामुळे कर्मचारी- अधिकाऱ्यांसह कार्यालयांवरील ताणही कमी होईल.

विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे

परिवहन विभाग लवकरच महाविद्यालय स्तरावर वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना देणार आहे. त्यामुळे दलालांना फाटा देता येईल व पारदर्शता वाढेल. राज्यातील महाविद्यालयांनी त्याकरिता पुढाकार घेऊन स्थानिक प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास त्यांना मदत केली जाईल. याप्रसंगी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षासह वाहन चालवताना घ्यायची काळजी याबाबतही माहिती दिली जाईल.

डॉ. प्रवीण गेडाम, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र