विद्यार्थ्यांकडून घरबसल्या सराव परीक्षा

देवेश गोंडाणे

नागपूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. इयत्ता बारावीच्या मूल्यांकनाची पद्धत अद्यापही जाहीर झाली नाही. तरीही कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापक विविध प्रकाशनांच्या मार्गदर्शिकांमधील प्रश्नपत्रिकांची छायांकित प्रत विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्याकडून ८० गुणांचा पेपर सोडवून घेत नमुना निकाल तयार करून ठेवत असल्याचे चित्र आहे.

शिक्षणतज्ज्ञांकडून बारावीची परीक्षा रद्द करण्याला विरोध होत असतानाही केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य शासनानेही परीक्षा रद्द केली. त्यामुळे बारावीचे मूल्यांकन कसे होणार, अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार, मोठय़ा संख्येने उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का, अशा संभ्रमात पालक आहेत. असे असताना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी मात्र, मूल्यांकनाचे सूत्र स्वत:च ठरवल्याचे चित्र आहे. यासाठी विषय शिक्षक ८० गुणांची प्रश्नपत्रिका तयार करीत आहेत. अनेक शाळांनी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कष्टही नको म्हणून मार्गदर्शिकांमधील छापील प्रश्नपत्रिकांची छायांकित प्रत तयार केली आहे. याआधारे तयार प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप किंवा घरी पाठवून सोडवून मागितली जात आहे. विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करून त्याच्या आधारे निकालही तयार ठेवला जात आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांनीही विद्यार्थ्यांकडून सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेत त्याआधारे निकाल तयार करण्यात आले होते. राज्याच्या शहरी भागातील राज्य मंडळाच्या शाळांनीही शक्कल लढवत विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिका सोडवून घेतल्या आहेत. घरून सोडवून मागितलेल्या उत्तरपत्रिकांच्या आधारे होणारे मूल्यांकन किती पारदर्शी राहील हे सांगणे कठीण असले तरी शाळांनी आधीच कामचलाऊ पद्धतीने निकाल तयार करून ठेवल्याने विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मूल्यांकनामध्ये अडथळा

अकरावीमध्ये विद्यार्थी हे परीक्षेचा केवळ सोपस्कार पार पाडतात. त्यांचे संपूर्ण लक्ष बारावीच्या परीक्षेवर असते. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन नेमके कसे करावे, हा प्रश्न शाळांसमोर आहे. इयत्ता नववी, दहावीच्या गुणांचा संदर्भ अकरावीसाठी वापरणे कठीण आहे. त्यामुळे शाळांनी तोंडी सूचना देऊन सराव परीक्षा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचा निकाल तयार करून ठेवण्याच्या सूचना दिल्याचे एका प्राध्यापकाने सांगितले.

शासनाकडून मूल्यांकनाबाबत आम्हाला सूचना नाहीत. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून अद्यापही शाळांना मूल्यांकनाविषयी काहीही सांगितलेले नाही.

 – दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ.