नागपूर : मानसिक आजारी रुग्णांना उपचारासोबत आनंदाचे काही क्षण देण्यासाठी नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात सातत्याने प्रयत्न होतात. गुरुवारच्या दहीहंडीच्या कार्यक्रमातही येथे कुणी कृष्ण, कुणी राधा, तर कुणी गोविंदा बनले.
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांवर उपचाराचाच एक भाग म्हणून सामाजिक संस्कारासाठी विविध उपक्रम राबवले जातात. जन्माष्टमीच्या निमित्ताने मनोरुग्णालयात गुरुवारी (७ सप्टेंबर) दहीहंडीचा कार्यक्रम झाला. त्यात एका रुग्णाला कृष्ण, एकाला राधा बनवण्यात आले होते. मनोरंजन विभाग परिसरात एका विशिष्ट उंचीवर दहीहंडी बांधण्यात आली. सुरुवातीला मनोरुग्णांनी सुंदर गीत सादर करत त्यावर नृत्य सादर केले. त्यानंतर कृष्णाने दहीहंडी फोडली. त्यानंतर सगळ्याच उपस्थित रुग्ण, डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे, डॉ. श्रीकांत करोडे, डॉ. ज्योत्स्ना, मेट्रन रूपाली ठाकरे उपस्थित होते. संयोजन योगा शिक्षिका ज्योती फिस्कल यांनी केले.
हेही वाचा – अशैक्षणिक कामासाठी समितीचे गठन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा
हेही वाचा – नागपुरात रुग्ण भर पावसात उघड्यावर! मेडिकल रुग्णालय परिसरात चालले काय?
नागपुरातील मनोरुग्णालयाची रुग्णक्षमता ९४० आहे. पुरुष मनोरुग्णांसाठी ६६० खाटा तर महिला मनोरुग्णांसाठी २८० खाटा मंजूर आहेत. येथे मनोरुग्ण बरा झाल्यावर त्याला विविध व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्यात बेकरीचे साहित्य बनवणे, कटिंग-दाढी, कॅटरिंगचे काम करण्यासह इतरही प्रशिक्षणाचा समावेश आहे.
