अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गुरूकूंज मोझरी येथे उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, पण ती धुडकावून कडू यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
बच्चू कडू म्हणाले, संजय राठोड यांनी जी सहानुभूती दाखवली त्याचा मी आदर करतो. मात्र, शेतकरी, शेतमजुरांसोबत आम्ही विश्वासघात करू शकत नाही. मागण्यांवर एकत्र निर्णय घ्या नाही तर आमची अंत्ययात्रा काढा, तशी व्यवस्था करा. या दोन्ही पैकी काही जरी केले तरी ते आम्हाला मान्य आहे. आम्ही कर्त्यव्यात कुठेही कसूर करणार नाही. रोज १५ ते २० शेतकरी आत्महत्या करत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
यावेळी संजय राठोड म्हणाले, बच्चू कडू यांनी सहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आज त्यांची भेट घेत त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. आज त्यांना उलटी झाली. त्याची प्रकृतीची काळजी आम्हा सर्वाना आहे. महिन्यातील दर मंगळवारी कॅबिनेट बैठक होते. त्यामध्ये आपल्या मागण्यांचा विषय मी विशेष म्हणून मांडणार आहे.
आ.संजय खोडके, सुलभा खोडकेंनी केले आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संजय खोडके व अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. संजय खोडके यांनी बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सुद्धा बच्चू कडूंच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आली असून अशा शेतकऱ्यांच्या लढवय्या नेत्याची अमरावती जिल्ह्याला गरज आहे.
त्यामुळे त्यांनी शेतकरी प्रश्नी आंदोलनाचा लढा सुरूच ठेवावा, परंतु प्रकृतीचा विचार करता उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती संजय खोडके यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी सुरु लढ्यात आपण सहभागी असल्याचे सुलभा खोडके यांनी सांगितले. मात्र उपोषणाचा मार्ग न अवलंबता आपण शासन दरबारी व मंत्रालय स्तरावर आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ. आपल्या प्रकृतीचा विचार करून आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन सुलभा खोडके यांनी केले.