अमरावती : भाजप म्हणजे अख्खे विषच आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी देखील हा पक्ष विषारी बनला आहे. पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या, लढणाऱ्या कार्यकर्त्यालाच तर ते जवळ करत नाहीत. विधानसभा, विधान परिषद सदस्य असो किंवा खासदार, या पदावर मूळ भाजपचा कार्यकर्ता दुर्बिन लावून शोधला, तरी सापडत नाही. ते भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी विषारी ठरत असतील, तर माझी काय स्थिती राहणार आहे, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारच्या एका निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी मुंबई येथील नरिमन पॉइंट परिसरात दोन वर्षांपूर्वी दिलेली जागा राज्य सरकारने रद्द केली. महायुती सरकारच्या काळात प्रहारला ही जागा देण्यात आली होती. ही जागा रद्द करताना पक्षाला पर्यायी जागा देण्यात आलेली नाही. या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, भाजप हा साधासुधा पक्ष नाही, दुधातही आणि पेढ्यातही विष आहे, हे भाजपने दाखवून दिले आहे. साप जसा दूध पाजल्यावरही विष सोडतो, तसा भाजप आहे. ते कधी उलटून विष सोडतील हे सांगता येत नाही. मी भारतीय आहे, असे म्हणण्यापेक्षा मी भारतीय जनता पक्षाचा आहे, असे म्हटले तरच तुम्ही टिकाल, अशी स्थिती त्यांनी करून ठेवली आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

राज्य सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला नरिमन पॉइंट येथील बरॅक क्रमांक १० येथे जागा दिली होती. याठिकाणी आधी जनता दल (सेक्यूलर) पक्षाचे कार्यालय होते. बरॅकमधील कक्ष क्रमांक एक आणि दोन मिळून एकूण ९०९ चौ. फूट जागेपैकी तब्बल ७०० चौ. फूट जागा प्रहारला देत फक्त २०० चौ. फूट जागा जनता दलाला ठेवण्यात आली होती.

२०२४ नंतर महायुतीशी नाते तोडल्यापासून कडू यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने प्रहारचे कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सामान्य प्रशासन विभागाने प्रसृत केलेल्या शासन निर्णयानुसार, ही जागा आता पूर्णपणे जनता दलाला देण्यात येणार आहे. प्रहारला राज्य सरकारने पर्यायी जागा मात्र दिलेली नाही. या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रहार पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.