नागपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या अर्वाच्य भाषेत टीका केली. त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचाराची परंपरा राज्याला लाभली आहे. परंतु सध्या राजकारणात काही विकृत लोक आले असून ते सुसंस्कृत राज्याच्या राजकारणाला गढूळ करण्याचे काम करत आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील साहेब यांच्यावर गल्लीछ शब्दात टिका केली. याचा विरोध करीत सुसंस्कृत महाराष्ट्राला गोपीचंद पडळकर ही लागलेली किड असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर याने केलेल्या बेताल वक्तव्यातून त्याची आणि त्याच्या पक्षाची मानसिकता आज महाराष्ट्राला बघायला मिळाली. मी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. महाराष्ट्राला लाभलेली सुसंस्कृत राजकारणाची समृद्ध परंपरा पायदळी तुडवण्याचे काम या वाचाळवीरांकडून सुरू आहे. अशी विकृती पोसण्याचे काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी याचा एकदा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
सत्तेतील अनेक मंत्री, आमदार व नेते हे मनात येईल ती वक्तव्य करीत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी थोर परंपरा आहे त्याला छेद देण्याचे काम भाजपा व सत्ताधाऱ्याकडुन वांरवार होत आहे. याला जर वेळीच आवर घातला नाही तर राजकारणाचा स्तर हा अतिशय खालच्या स्तरावर जाईल असे मतही अनिल देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.
यापुर्वी राजकारणात असे कधीच घडले नाही. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टोकाचा वाद जरी झाला तरी अशी भाषा कोणी वापरली नाही. मतभेद जरी असले तरी मनभेद कधीही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात झाले नाही. राज्याच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी नेहमी विरोधकांना सोबत घेण्याचे काम केले आहे. परंतु गेल्या काही वर्षापासुन विरोधक हे आपले कट्टर दुश्मनच असल्याच्या भावनेतून त्यांना संपविण्याचे काम सत्ताधाऱ्याकडुन करण्यात येत आहे. यातूनच पडळकर यांच्यासारखी विकृत्ती जन्माला येते. अशी विकृत्ती जर वेळीच ठेचली गेली नाही तर भविष्यात राजकारण आणि राजकारणी व्यक्तीकडे सामान्य नागरीकांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलेल. यामुळे अश्या विकृत्तींना वेळीच ठेचण्याची गजर असल्याचेही अनिल देशमुख म्हणाले