गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. समाज कल्याण विभागाच्या सिरोंचा, वांगेपल्ली (अहेरी) आणि नवेगाव (गडचिरोली) येथील निवासी शाळांमधील १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विमानप्रवासाद्वारे बंगळूरु येथील ‘इस्रो’ केंद्राला भेट देण्यासाठी उड्डाण केले. विशेष म्हणजे, यातील अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी साधी रेल्वेही पाहिली नव्हती, किंवा जिल्ह्याचे मुख्यालयही पाहिले नव्हते. त्यांच्या या स्वप्नवत प्रवासाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ते कुठे जात आहेत, कसे जाणार आहेत आणि काय पाहणार आहेत, असे आपुलकीने विचारले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘मुलांनो, खूप खूप अभ्यास करा आणि यशस्वी व्हा,’ या शब्दात प्रेरित केले. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनीही विमानतळावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. सचिन मडावी यांच्या संकल्पनेतून साकारली योजना

या अभिनव उपक्रमाची संकल्पना सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) डॉ. सचिन मडावी यांनी मांडली होती. जिल्हाधिकारी पंडा यांनी त्यास तत्काळ मंजुरी दिली. तसेच पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी या योजनेसाठी निधी मंजूर केला. तत्पुर्वी गडचिरोली येथून या विद्यार्थ्यांना बसद्वारे हिरवी झेंडी दाखवून नागपूर विमानतळावर रवाना करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रकल्प अधिकारी चेतन हीवंज या प्रसंगी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणाला त्यांच्या पालकांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू पाहायला मिळाले.