नागपूर : एका भंगार विक्रेत्याने तहसील पोलीस ठाणे हद्दीतील गार्डलाईन परिसरात एक जुनी कार विकत घेतली. सहा दिवसांनी ती कापण्यासाठी त्याचे कर्मचारी जवळ गेले असता डिक्कीत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नौशाद नामक भंगार व्यवसायिकाने आठ दिवसांपूर्वी एक जुनी कार विकत घेतली. त्याच्या गोदाम परिसरात ती पडून होती. शुक्रवारी सकाळी ती कापण्यासाठी तो आणि त्याच्याकडे काम करणारे कार जवळ जाताच त्यांना दुर्गंध येऊ लागला. त्यांनी कारची डिक्की उघडताच त्यात ३५ वर्षे वयोगटातील मृतदेह आढळला. त्याने ही माहिती त्यांनी तहसील पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने हे सुद्धा आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. आरोपींनी हत्या करून कारच्या डिक्कीत मृतदेह लपवला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. मृत व्यक्तीती ओळख अद्याप पटली नसून पोलीस त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान या मृतदेहाच्या शरीरावर जखमा नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतरच या मृत्यूचे कारण पुढे येईल.