चंद्रपूर : आपत्ती व्यवस्थापनाची ३२ कोटींपेक्षा अधिकची कामे झोन क्रमांक एक मध्येच घेतली जात आहेत. त्यामुळे दोन व तीन क्रमांकाच्या झोन मध्ये येणाऱ्या प्रभागातील माजी नगरसेवक चांगलेच संतापले आहेत. आज शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरते. पठाणपुरा व विठ्ठल मंदिर प्रभागात तर दरवर्षी पूर येतो. अशा वेळी पुरग्रस्त भागात निधी खर्च करण्याऐवजी सिव्हील प्रभागात निधी खर्च केला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक महापालिकेचे सेवानिवृत्त शहर अभियंता अनिल घुमडे यांच्या काळात राज्य सरकारकडे आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला होता. मात्र दोन वर्षात या निधीबाबत काहीही हालचाली झाल्या नाही.दोन वर्षात महापालिकेत घुमडे व विजय बाेरीकर असे दोन शहर अभियंता होवून गेले. त्यानंतर एक महिन्यापूर्वीच शहर अभियंता पदी रवी हजारे रूजू झाले आहेत. दरम्यान आता राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या ३२ कोटींपेक्षा अधिकच्या कामांना मंजूरी दिली आहे. सरकारची मंजूर येताच महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत. पावसाळ्यात शहरात सर्वत्र पूर येत असतांना झोन क्रमांक एक मध्येच ही सर्व ३२ कोटींची कामे आहेत. जटपूरा प्रभाग क्रमांक ७ मध्ये जलनगर भागात रिटेनिंग वॉलचे ३ कोटी ६८ लाख ३० हजार १४८ कोटींचे कामे आहे. त्या पाठोपाठ नगिनाबाग प्रभागात भवानी नगर परिसरात लोकल स्टॉम वाॅटर ड्रेनचे ४ कोटी १४ लाख २७ हजार ७५४ रूपयांचे काम आहे.
दे.गो.तुकूम प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी नगर परिसरात लोकल स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे ६ कोटी २१ लाख ३६ हजार १५० रूपयाचे काम आहे. दे.गो.तुकूम प्रभाग क्रमांक १ मध्ये तुळशीनगर परिसरात लोकल स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे ५ कोटी ५२ लाख ३३ हजार ३५१ कोटींचे काम आहे, तर दे.गो.तुकूम प्रभाग क्रमांक १ मध्ये वृंदावन नगर परिसरात लोकल स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे ५ कोटी १७ लाख ८१ हजार ९५२ रूपयांचे काम आहे. वडगाव प्रभागात बलकी कॉलनी, हवेली गार्डन, स्नेहनगर, आंबेडकर सभागृह परिसरात लोकल स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे २ कोटी ६३ लाख ५६ हजार ६६५ रूपयांचे काम आहे. ही सर्व कामे झोन क्रमांक एक अंतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये आहे.
झोन क्रमांक दोन व तीन अंतर्गत येणाऱ्या पूरग्रस्त प्रभागात एक नव्या पैशाचे काम घेण्यात आलेले नाही. त्यामुळे माजी नगरसेवक चांगलेच संतापले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचा निधी हा पूरग्रस्त भागात सर्वाधिक खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र पूरग्रस्त भाग सोडून त्या तुलनेत पूर न येणाऱ्या भागात निधी खर्च होत असल्याची तक्रार कॉग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर, आम आदमी पक्षाचे सुनील मुसळे यांनी केली आहे. तसेच भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या जवळच्या कंत्राटदाराला ही सर्व कामे देण्यात आली आहे असाही आरोप आहे. त्यामुळे ही कामे वादात अडकली आहे. यासंदर्भात अभियंता अतुल टिकले यांना विचारले असता, जिथे कामे घेण्यात येत आहे तिथेही पूर येत असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून तिथे कामे घेतली जात आहे अशी माहिती दिली. शहर अभियंता रवी हजारे यांना विचारले असता, दोन वर्षापूर्वी पाठविलेल्या प्रस्तावाला आता मंजूरी मिळाली. त्यामुळे आता ही कामे घेतली जात असल्याचे सांगितले.