लोकसत्ता टीम

नागपूर : तामिळनाडूतून अजून दोन अतिशय सुंदर पालीच्या नवीन प्रजातींचा शोध लावण्यात साताऱ्यातील वन्यजीव संशोधक अमित सय्यद यांना यश आले आहे. हे संशोधन न्युझीलंड येथील झूटॅक्सा नामक शास्त्रिय नियतकालिकेत नुकतेच प्रकाशित झाले आहे.

काही दिवसापूर्वी तामिळनाडूवरून अजून एका अशा सुंदर पालीचा शोध लागला होता, ज्याला अमितने त्याच्या वडिलांचे नाव दिले. तसेच सदर शोध लागलेल्या या नवीन पालींचे नाव हे त्यांच्या शरीरावर असणाऱ्या रचनेप्रमाणे तसेच त्यांच्या सुंदर रंगकनांवरून ठेवण्यात आले आहे. एका पालीचे नाव हे तिच्या शरीरावर असणाऱ्या पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या, अशा तीन सुंदर रंगांच्या छटांच्या सयोजनमुळे “निमस्पिस ट्रायड्रा ” असे ठेवण्यात आले आहे, तर दुसऱ्या पालीचे नाव “निमास्पिस सुंदरा” हे तिच्या अंगावर असणाऱ्या काळ्या, पिवळ्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या सुंदर नक्षीमुळे ठेवण्यात आले आहे. या पालींच्या शरीरावर असणाऱ्या रंगांमुळे त्या अतिशय सुंदर दिसतात. या दोन्ही पाली तामिळनाडूमधील विशिष्ट जंगलामध्ये आढळून येतात.

आणखी वाचा-वर्धा : नदीपात्रात बिबट्याचा मृतदेह आढळला, मृत्यूचे कारण अज्ञात

अमित सय्यदने सांगितले की, ह्या दोन्ही पाली आकाराने अतिशय लहान असून या जास्तीत जास्त ३५ मिलिमीटर एवढ्याच लांबीच्या किंवा आकाराच्या असतात. भारतातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध असल्यामुळे पश्चिम घाटातील विविध जंगलामध्ये असंख्य प्रकारचे लहान मोठे प्राणी आपले वास्तव्य टिकून आहेत. प्रत्येक प्राणी जसे कीटक, पक्षी, बेडूक किंवा सरपटणारा कोणताही प्राणी असो तो पर्यावरण साखळीमध्ये अतिशय महत्वाचा भाग असतो. शरीरावर असणारे विविध नक्षी किंवा विविध रंगछटा हे त्यांना पर्यावरणामध्ये एकरूप होण्यासाठी तसेच शत्रूपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची मदत करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच सुंदर सुंदर पालिंच्या प्रजातीच्या शोधामुळे पश्चिम घाट हे सुंदर पालींच्या विविध प्रजातींचे माहेरघर असल्याचे सिद्ध झाले आहे, अमित सय्यद हे कित्येक वर्ष भारतातील विविध सरीसुपांवर अभ्यास करत असून आजपर्यंत त्यांनी बऱ्याच नवीन प्रजातींचा शोध लावला आहे, वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी चे ते स्वतः संस्थापक असून त्यांनी पर्यावरण संवर्धन वन्यजीव रेस्क्यू त्याचबरोबर संशोधनामध्ये असंख्य विद्यार्थी सुद्धा तयार केलेले आहेत. सदर संशोधनामध्ये अमित सय्यद हे प्रमुख संशोधक असून त्यांच्याबरोबर सॅमसंग कुरुंबकरण, राहुल खोत, शिवा हर्षल, ओमकार अधिकारी, आयान सय्यद, मासूम सय्यद, अहमद फैजल, अहमद जेरिथ, शुभंकर पांडे, जयदत्त पूरकायस्था आणि शवरी सुलाखे हे सहभागी होते.