नागपूर: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शहराच्या मध्यभागी संविधान चौकात आदिवासी आंदोलनामुळे नागपूरकरांनी दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी अनुभवली. अनेकांना रेल्वेस्थानकावर जाता आले नाही. तसेच या परिसरातील दवाखाना, शाळा, बाजारपेठकडे जाणारे सर्व रस्ते रात्री उशिरापर्यंत वाहन कोंडीमुळे बंद होते. यामुळे नागरिकांची कमालीची गैरसोय झाली. आंदोलनाशी कुठलाही संबंध नसलेल्या सव्रसामान्य चाकरमान्यांनी या विषयची खदखद समाजमाध्यमांवर व्यक्त केली.
गोवारी समाजाला आदिवासीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या ११ दिवसांपासून तीन युवक उपोषण करीत असून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी जवळपास ३० ते ४० हजारावर गोवारी बांधव संविधान चौकात जमा झाले. गर्दीमुळे संपूर्ण संविधान चौकाकडे जाणारे सर्वच रस्ते बंद झाले. चौकाचौकात वाहनकोंडी निर्माण झाली. अनेकांनी पर्यायी मार्गावरून वाहन काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या भागाकडून शहरात येणारे सर्वच रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यामुळे नागपूरकर हैराण झाले. सामान्य नागरिकांनी गैरसोयीबाबत आपली खदखद समाजमाध्यमांवर व्यक्त करीत भावनांना वाट मोकळी केली.
हेही वाचा >>>वर्धा-कळंब मार्गावर लवकरच पॅसेंजर धावणार, आठवड्यातून पाच दिवस गाडी चालविण्याचे नियोजन
पोलिसांचे अपयश
कडक शिस्तीचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली होताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील सतर्कता कमी झाली. एवढी मोठी गर्दी होणार असल्याची पुसटशी कल्पना पोलिसांना नव्हती. त्यामुळे गुप्तचर विभागही गाफील राहिल्याने त्यांना आंदोलनाला होणा-या गर्दीचा अंदाज आला नाही. वाहतूक पोलिसांनी तर थेट शरणागती पत्करली. वाहतूक कोंडी असतानाही वाहतूक विभाग निष्क्रिय असल्यामुळे सामान्य नागरिक वेठिस धरल्या गेले. पोलीस आयुक्तांनी आंदोलन स्थळाला भेट दिल्यानंतर पाठ फिरवताच अनेक पोलीस कर्मचारी निष्क्रिय झाले. त्यामुळे सामान्य नागरिकांनीही पोलिसांच्या ढिसाळ नियोजनावर आगपाखड केली.
कायदेशिर मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु, आंदोलनाचा अतिरेक होऊ नये किंवा आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसू नये. सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये. संविधान चौकाकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी मी तब्बल ४ तास वाहतूक कोंडीत अडकून पडलो होतो. – विलास मेश्राम (विद्यार्थी)