गडचिरोली : बुधवारी सकाळी ७ वाजून २८ मिनिटांना गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के जाणवले. ५.३ रिष्टर स्केल इतकी तीव्रता असलेल्या या भूकंपाचे केंद्र गडचिरोलीच्या सीमेपासून ८० किमी दूर असलेल्या तेलंगणातील मुलुगू येथे होते. गेल्या चार वर्षात गडचिरोलीला चार भूकंपाचे धक्के बसल्याने तेलंगणा सरकारच्या मेडीगड्डा धरणावर आता पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कालेश्वरम उपसा सिंचन योजनेअंतर्गत येत असलेल्या मेडीगड्डा धरण बांधकामात भ्रष्टाचार केल्याचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसने तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

या निवडणुकीत ‘केसीआर’ यांना पायउतार व्हावे लागले. गडचिरोलीच्या सिरोंचा तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या बांधकामावरून सुरुवातीपासूनच परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवत असल्याने सीमा भागातील नागरिकांना मोठी अडचण सहन करावी लागते. आता याच धरणामुळे भूकंपाचे संकट अधिक गडद झाले आहे. गोदावरी खोऱ्यात येणारा हा परिसर भूकंप प्रवण क्षेत्र ३ मध्ये मोडतो. त्यामुळे या परिसराला कायम भूकंपाचा धोका आहे. यापूर्वीही येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. परंतु धरण बांधकामानंतर यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : “आमदार गायकवाड यांच्या आरोपात तथ्य, पंख छाटण्याचा हा प्रकार…”, ‘या’ नेत्याची खासदार व आमदाराच्या वादात उडी

गेल्या चार वर्षात या परिसरात चारवेळा भूकंप झाला आहे. त्यापैकी बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता सर्वाधिक होती. गडचिरोलीत साधारण २० सेकंद याचे कंपन जाणवले, भूकंपाचे केंद्र तेलंगणातील मुलुगू होते. तर यापूर्वी झालेल्या भूकंपाचे केंद्र गडचिरोलीतील उमानूर, जाफ्राबाद आणि महागांव परिसरात होते. त्यामुळे भविष्यात याहूनही मोठा भूकंप होऊ शकतो असे तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा : “देवेंद्रजींची मनिषा आम्ही पूर्ण केली, आज त्यांनी आमची…”, कोण म्हणतय असं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणामुळे नैसर्गिक संरचनेला धक्का

गोदावरी खोऱ्यातील हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र ३ मध्ये मोडतो. त्यामुळे मेडीगड्डा आणि त्यावरील उर्वरित धरण बांधकामावेळेस तज्ञांनी विरोध केला होता. परंतु तेलंगणा सकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महाराष्ट्र सरकारनेही हा विषय गंभीरतेने घेतला नाही. अशा प्रकारच्या धरणामुळे भुगर्भातील नैसर्गिक संरचनेला धक्का बसतो त्यामुळे भूकंपाची तीव्रता वाढून अधिक नुकसान होऊ शकते. ४ नोव्हेंबरला आलेला भूकंप हा गेल्या दशकभरातील सर्वाधिक तीव्रतेचा होता. त्यामुळे याचे धक्के तेलंगणा, छत्तीसगड आणि पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्याला बसले, असे आभासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.