नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्या अनेक अधिकाऱ्यांना आतापर्यंत अटक झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शिक्षण विभाग भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याचा परिणाम दैनंदिन कार्यालयीन कामावरही होत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर थेट शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंग यांनी पोलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांची बुधवारी भेट घेऊन त्यांना संपूर्ण चौकशीशिवाट अटकेची कारवाई न करण्याबाबत चर्चा केली होती. मात्र, शुक्रवारी शालार्थ आयडी घोटाळ्यात प्रचंड मोठी घडामोडी समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये पोलिसांनी पहिल्यांदाच एका संस्थाचालकाला अटक केली आहे. बनावट दस्तऐवजांच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांनी चरण नारायण चेटुले (६३, भंडारा) यांना अटक केली आहे. प्रकृतीच्या कारणावरून संस्थाचालकाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षणक्षेत्रात व विशेषत: संस्थाचालकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. चेटुले भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे राजश्री शिक्षण संस्था व नवोदय शिक्षण संस्था या दोन संस्थांमध्ये अध्यक्ष आहेत. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर, यादवनगरची बोगस व बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने राजश्री शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली.
मुन्ना वाघमारेच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी या घोटाळ्यात पुडके, उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात पुडकेच्या कागदपत्रांवर चोटुलेची स्वाक्षरी होती. पोलिसांनी याची खातरजमा केल्यानंतर गुरुवारी रात्री भंडाऱ्यातून चेटुलेला ताब्यात घेतले. रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी न्यायालयासमोर पोलिस कोठडीची मागणी केली आहे.