लोकसत्ता टीम

नागपूर: वातावरणातील बदलांमुळे नागपुरात सर्दी, खोकल्यानंतर डोळे येण्याची म्हणजे कंजंक्टिवायटिसची (नेत्रश्लेष्मला) साथ पसरली आहे. मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांतील नेत्ररोग विभागात १०० पैकी २५ रुग्ण कंजंक्टिवायटिसचे आहेत. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केवळ ३८० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मेयोतील नेत्ररोगाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज डोळ्यांशी संबंधित विविध आजाराचे २०० रुग्ण येतात. त्यापैकी ४० ते ५० रुग्ण हे कंजंक्टिवायटिसचे आहे. ही स्थिती एक आठवड्यापासून असल्याचे मेयोच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. राहुल डगवार यांनी सांगितले. मेडिकलच्या नेत्ररोग विभागातही रोज सुमारे ३०० रुग्ण येतात. त्यापैकी ५० ते ७५ रुग्ण हे कंजंक्टिवायटिसचेच आहे. खासगी नेत्ररोग तज्ज्ञांकडेही अशीच स्थिती आहे.

आणखी वाचा-ताडोबातील निमढेला बफर क्षेत्रात.. “बबली” वाघिणीच्या बछड्यांचे “मान्सून मॅजिक”

मेयोतील नेत्ररोग तज्ज्ञानुसार, येथील नेत्ररोग विभागात सुरुवातीला एक रुग्ण कंजंक्टिवायटिसचा येतो. त्याच्या दोन ते तीन दिवसांत या रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य उपचाराला येतात.

सूक्ष्म जिवाणूंमुळे पसरतो आजार

कंजंक्टिवायटिस हा संसर्ग वातावरणामध्ये बदल झाल्याने सूक्ष्म जिवाणूंमुळे पसरतो. हा आजार फक्त शरीर संपर्काद्वारे आणि स्त्राव संपर्काद्वारे पसरू शकतो. या आजाराचे लक्षण दिसल्यास रुग्णांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा महापालिका आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करावेत. हा आजार बरा होतो. -डॉ. गोवर्धन नवखरे, साथरोग अधिकारी, महापालिका.

आणखी वाचा-Monsoon Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार, तीव्रता वाढत असल्याने मान्सूनचा जोर वाढला

नागरिकांनी काळजी घ्यावी

जिल्ह्यात सद्यस्थितीत डोळे येण्याच्या साथीचे (कंजक्टिव्हायटिस) रुग्ण आढळत आहेत. या विषाणूजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी. -डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी.

लक्षणे काय?

-कंजंक्टिवावर सूज
-डोळ्याच्या आतील भाग लाल होणे
-डोळ्याची आग होणे आणि खाज सुटणे
-धुसर दृष्टी आणि प्रकाशाप्रती संवेदनशीलता
-डोळ्यातून स्त्राव येणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपाय काय?

-स्वच्छता राखावी, नियमित हात धुवावे
-डोळ्यांना सारखा हात लावणे टाळावे
-एकमेकांचा टॉवेल किंवा रुमाल वापरू नये
-उशीची खोळ नियमित बदलावी
-डोळ्यांची सौंदर्य प्रसाधने किंवा डोळ्यांची काळजी घेणाऱ्या वस्तू: दुसऱ्याच्या वापरू नये