बुलढाणा : बातमीचे शीर्षक वाचून कोणीही बुचकळ्यात पडणे अन् गोंधळून जाणे स्वाभाविकच आहे. पण हे कटू सत्य अन् विदारक वास्तव आहे. एरवी कोणाच्या घेण्या देण्यात नसलेले आणि कुणाच्या खिज गणतीत नसलेले अमोना या गावातील कष्टाळू, काळ्या मातीला (शेतीला) आईसमान मानणारे शेकडो शेतकरी खरोखरच मराठवाड्यातील पाण्याला पर वैतागलेय!…

विदर्भाच्या टोकावरील बुलढाणा जिल्ह्यातील अमोना (तालुका चिखली) येथील शेकडो शेतकरी, गावकरी आणि शेतमजूर, पाण्याच्या अजब चक्रव्युहाने घायकुतीला आले आहे. त्यांची कथा अन् व्यथा विचित्र आहे.

अमोना गावातील या शेतकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. शेतरस्ता आणि पुलाअभावी शेतकऱ्यांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. एरवी पाणी म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांचा जीव की प्राण असतो. मात्र गावाकऱ्यांना हे पाणी नकोसे झाले आहे. मराठवाड्यातील धरणाचे हे पाणी असल्याने उपाययोजना कुणी करायची, विदर्भ की मराठवाड्यातील यंत्रणेने हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याला फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे.

काय आहे प्रकार?

यामुळे अमोना येथील शेतकरी पार वैतागले आहेत. जालना जिल्ह्यात येणाऱ्या डोलखेडा प्रकल्पाचे बॅकवॉटर अमोना शिवारात तुंबते. त्यामुळे या भागातील शेती अक्षरशः जलमय होते. शेतात पाणी की पाण्यात शेती? असे भीषण चित्र निर्माण झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना, माय माऊल्यांना जीव मुठीत धरून शेतात जावे लागते. शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या, शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले, मात्र हा प्रश्न मराठवाड्याचा की विदर्भाचा, यातच प्रशासकीय यंत्रणा गोंधळल्याचे मजेदार आणि तितकेच चीड आणणारे दुर्दैवी चित्र आहे.

अमोना शिवारातील गट क्रमांक ३३१, ३३७,३२२,३०२ या भागातील शेती प्रामुख्याने प्रभावित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची प्लॉटिंगची शेती आहे, त्यामुळे महिलांना शेतात जावेच लागते. मात्र नदीत पाण्याचा तुंब एवढा आहे की जीवावर उदार होऊन थर्माकोलच्या साहाय्याने बनवलेल्या होडीतून त्यांना पलीकडच्या काठावर जावे लागते.

हा प्रश्न एका आठवड्यात सोडवावा, यावर ठोस निर्णय व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांच्यावतीने नीता ताठे, विजय सुरडकर, गणेश वाघ दीपक वाघ, कैलास मोरे, संदीप ताठे, नामदेव वाघ यांनी ही मागणी रेटली आहे. यामुळे एका आठवड्यात त्यांना न्याय मिळेल का? असा प्रश्न समोर आला आहे. त्याचं उत्तर कोण देणार, मराठवाडा सोडविणार की विदर्भ? हा खरा यक्ष प्रश्न आहे.