अकोला: राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच तापत आहे. कर्जमाफीवरून शिवसेना ठाकरे गटाने आता सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टर मोर्चाने धडक दिली. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या कळीचा मुद्दा ठरत आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. निसर्गाच्या अनियमिततेमुळे उत्पादन घटले.

शेतमालाला हमीभाव मिळत नाही. पडलेल्या भावात शेतमाल विक्री कराव लागत आहे. परिणामी, आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला. या संकटाला कंटाळून अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. शेतकऱ्यांची ही स्थिती लक्षात घेता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अकोल्यात आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.

अकोला क्रिकेट क्लब मैदानावर शेतकरी एकत्रित जमले. या मैदानावरून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा टॉवर चौक, मदनलाल धिंग्रा चौक, गांधी रोड, पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकरी शेतकरी हातात रुमणे व शिदोरी घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच शेतकरी त्यांची शिदोरी उघडून जेवण करण्यास बसले. तत्काळ कर्जमाफी देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु, सत्ता स्थापन होताच नेत्यांना कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर झाला, असा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला. संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. केंद्र सरकारकडून विशेष निधी आणत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली. मोर्चात शिवसेना ठाकरे पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चासाठी गावनिहाय नियोजन

शिवसेना ठाकरे गटाने ट्रॅक्टर मोर्चासाठी जिल्ह्यातील गाव, सर्कल, तालुका आणि शहर पातळीवर नियोजन केले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे बाळापूर, अकोला पूर्व, मूर्तिजापूर व अकोट अशी विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी पक्षाचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ७०० गावांतील हजारो शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.