यवतमाळ : बनावट नोटा छापणाऱ्या टोळीतील चार जणांना अटक करण्यात पोलीसांना यश आले असून या टोळीकडून चार बनावट नोटांसह एक लाख ९१ हजार ६२४ रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई केली.
राजकुमार श्रावण पारधी रा. सावळी ता.मानोरा जि. वाशिम सध्या रा. नवीन पुसद जि. यवतमाळ, तुकाराम दामाजी गुहाडे रा.हर्षी ता. पुसद, भाऊसाहेब आनंदराव पतंगे रा. कोंदूर ता. कळमनुरी जि. हिंगोली, रामदास किसन भरकाडे रा. डोणवाडा ता. वसमत जि. हिंगोली या आरोपींना अटक केली.
या टोळीतील साथीदार पंडीत भालेराव रा.शिवणी ता. कळमनुरी जि. हिंगोली हा फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. या पाचही आरोपींविरुद्ध पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार ५ जून रोजीच्या रात्री पेट्रोलींग करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, नवीन पुसद येथील सोनू पाटील यांच्या भाड्याच्या रुममध्ये राजकुमार पारधी हा राहत असून त्याचेकडे काही संशयीत इसम आलेले आहे. ते ५०० रुपये दराच्या बनावट चलनी नोट तयार करत आहेत.
या माहितीच्या आधारे नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय शिताफिने नवीन पुसद येथील मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी घराच्या चारही बाजूने सापळा लावला. त्यानंतर एक इसम संशयीरित्या हालचाल करीत असताना अडकल्याने पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला ताब्यात घेतले.
त्याने त्याचे नाव राजकुमार असे सांगून सध्या या घरात परिवारासह भाडयाने राहत असल्याचे सांगितले. त्याच्या समक्ष घरात प्रवेश केला असता घराच्या बेडरुममध्ये तीन इसम गोल रिंगन करुन त्यांच्या समोर व बाजूला ५०० रुपये दराच्या चलनी नोटा, दोन वर्तुळाकार काच, तसेच ५०० रुपयांच्या नोटाचे आकारचे कोऱ्या कागदाच्या बंडलच्या सहाय्याने वेगवेगळ्या कंपनीचे केमीकलच्या बॉटल व केमिकल मिश्रीत कागदाच्या सहाय्याने भारतीय बनावटीच्या चलनी नोटा बनवत असल्याचे आढळले.
पंचासमक्ष या ५०० रुपये दराच्या नोटांची पडताळणी केली असता त्यांच्या ताब्यातील एकूण ११७ नोटामध्ये ५०० रुपये दराच्या चार नोटा बनावट असल्याचे दिसून आले. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून केला जात आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतीरीक्त पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे., पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात गजानन गजभारे, शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, तेजाब रणखांब, सुनिल पंडागळे, रविंद्र श्रीरामे, राजेश जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
बनावट नोटांचे मराठवाडा कनेक्शन
सदर ठिकाणावरुन नोटाचे आकारचे कोऱ्या कागदाचे बंडल, वेगवेगळ्या कंपनीच्या केमीकलच्या बॉटल व केमिकल मिश्रीत नोटांच्या आकाराचे काळपट कागद, दोन गोलाकार काच तसेच ५०० रुपयाच्या चार बनावट नोटा, तसेच ५०० रूपयांच्या ११३ चलनी नोटा व इतर साहित्य असा एकूण एक लाख ९१ हजार ६२४ रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. यातील बहुतांश आरोपी मराठवाड्यातील आहेत. त्यामुळे या बनावट नोटांचे तर विदर्भासह मराठवाड्यात असल्याचे सांगण्यात येते.