गडचिरोली : अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे ख्रिश्चन मिशनरीद्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘आशीर्वाद हॉस्टेल’ या अनधिकृत वसतिगृहावर प्रशासनाने मंगळवारी (दि. ४) धडक कारवाई केली. गेल्या तब्बल ११ वर्षांपासून कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय सुरू असलेल्या या वसतिगृहातून प्रशासनाने ९१ अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षित शासकीय ठिकाणी हलविले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या अनधिकृत वसतिगृहाबाबत प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व अहेरीचे उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक स्थापन करण्यात आले. तहसीलदार बालाजी सोमवंशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, बाल कल्याण समितीचे सदस्य दिनेश बोरकुटे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुळे यांचा या पथकात समावेश होता. पथकाने आज दुपारी वसतिगृहाची सखोल तपासणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.

तपासात, या संस्थेकडे समाजकल्याण विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय किंवा महिला व बालविकास विभाग यापैकी कोणत्याही शासकीय प्राधिकरणाची अधिकृत नोंदणी नसल्याचे निष्पन्न झाले. गेल्या ११ वर्षांपासून हा गंभीर प्रकार सुरू असतानाही तो प्रशासनाच्या निदर्शनास कसा आला नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचे स्पष्ट होताच, प्रशासनाने तातडीने तेथील विद्यार्थ्यांना हलविण्याचा निर्णय घेतला. पोलीस निरीक्षक मंगेश वळवी व उपनिरीक्षक करिष्मा मोरे यांच्या मदतीने, वसतिगृहातील ४८ मुलींना खमनचेरू येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात, तर ४२ मुलांना एकलव्य शाळा, अहेरी येथे सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले.

वसतिगृहात प्रार्थनास्थळ?

प्रशासकीय तपासणीदरम्यान, वसतिगृहाच्या वरच्या मजल्यावर चर्च व प्रार्थनास्थळ असल्याचेही आढळून आले. इतकेच नव्हे, तर काही दिवसांपूर्वीच येथे एका ‘युवा मेळाव्या’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमादरम्यान धर्मप्रसाराशी संबंधित साहित्य आणि पुस्तकांची विक्रीही झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मुला-मुलींच्या वसतिगृहात अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन का केले जात होते, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, जिल्हा बाल कल्याण समिती बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) या वसतिगृहाची स्वतंत्र पाहणी करणार आहे. समितीच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाईची दिशा ठरणार असून, या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्ही धाड टाकून दस्तऐवज तपासले असता कोणतीही अधिकृत परवानगी आढळली नाही. जोपर्यंत शासनमान्य परवानगी मिळत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी राहू दिले जाणार नाही. – ज्योती कडू, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.

चेन्नई येथील ‘फ्रेंड्स मिशनरी प्रेयर बँड’ या संस्थेची नोंदणी आमच्याकडे आहे; परंतु महाराष्ट्र शासनाची परवानगी नाही, हे खरे आहे. विद्यार्थ्यांना येथे कोणताही त्रास होत नव्हता. झालेल्या युवा मेळाव्याचा आणि हॉस्टेलचा परस्पर संबंध नाही. – अरविंद वसावे, सचिव, आशीर्वाद वसतिगृह, नागेपल्ली.