गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा दौऱ्यावेळी भेट दिलेल्या छत्तीसगड सीमेवरील कवंडे येथे घातपात घडवून आणण्याकरता ‘रेकी’ करत असताना एका जहाल नक्षलवाद्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (२८, रा. कवंडे ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. सहा वर्षांपूर्वी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्यातही त्याचा सक्रिय सहभाग होता.
२७ जूनला कवंडे जंगल परिसरामध्ये गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाची दोन पथके, कवंडे येथील पोलीस पथक आणि राज्य राखीव दलाच्या ३७ बटालियनचे एक पथक नक्षलविरोधी अभियान राबवत होते. यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस मुख्यालयात आणून त्याची चौकशी केली असता तो अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो असल्याचे निष्पन्न झाले. सध्या तो कोरची दलममध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत होता.
कवंडे जंगल परिसरात घातपात घडवण्याची योजना असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्यावर पाच गुन्हे नोंद असून तपासकामी त्यास कुरखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आज, शनिवारी त्यास कुरखेडाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, सत्यसाई कार्तिक, उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व भामरागडचे उपअधीक्षक अमर मोहिते, कुरखेडाचे उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कवंडेचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक मंदार शिंदे, विशेष अभियान पथक तसेच सीआरपीएफ ३७ बटा. सी – कंपनीचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली.
१३ व्या वर्षी नक्षल चळवळीत
वयाच्या तेराव्या वर्षीच अंकल उर्फ मन्नू पल्लो हा नक्षल चळवळीत दाखल झाला. मूळचा कवंडेचा असलेला अंकल २०१२ मध्ये छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या निब कंपनीतून सदस्य पदावर भरती झाला. २०२७ मध्ये तो भामरागड दलममध्ये बदली होऊन आला. २०१७ ते २०२० या दरम्यान कोरची दलममध्ये उपकमांडर म्हणून त्याने काम केले. २०२० पासून तो महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवर कवंडे जंगल परिसरात राहून नक्षलवादी चळवळीत सक्रिय होता.