नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. नागपुरातील ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमातही त्यांनी केलेल्या विधानाने उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. नितीन गडकरी प्रत्यक्षात काय बोलले याबाबत आपण जाणून घेऊ या.
नितीन गडकरी म्हणाले, ॲग्रोव्हिजनसाठी तयार होणाऱ्या इमारतीत समाजोपयोगी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. आयोजकांनी आणखी त्यात समाजाला काय देता येईल? त्याबाबतची कल्पना सुचवावी. त्यानुसार येथे काम केले जाईल. या इमारतीत महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासनाचे कार्यक्रम घेण्यासाठी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाला विनंती केली जाईल. योगा हा निरोगी राहण्यासाठी फार महत्वाचा आहे. परंतु योगासनाचा उपक्रम नि:शुल्क करायला नको. कारण लोकांची प्रवृत्ती चांगली नाही. लोकांना फुकट दिल्यास हरामाचा माल वाटतो. त्यांच्याकडून दोन रुपये माफक शुल्क आकारल्यास योगाचेही महत्व लोकांना कळेल. ते नियमित योगासन करण्यासाठी येतील, असेही गडकरी म्हणाले.
ॲग्रोव्हिजनच्या इमारतीत आणखी काय ?
ॲग्रोव्हिजनसाठी तयार होणाऱ्या सहा मजली इमारतीत कृषी प्रयोगशाळा, शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठीचे प्रशस्त व संगणकीय साधनांनी सुसज्ज सभागृह, सेंद्रीय फळ व धान्याचा मोठा बाजार, फुट कोर्ट, वाहन तळ, खासदार सांस्कृतिक महोत्सव, विदर्भ ॲडव्हांटेजसह इतरही विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थांचे कार्यालयासह इतरही सोय- सुविधा राहणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले. येथे नवीन संस्थांनाही सामाजिक उपक्रमासाठी सभागृहासह इतरही सोयी उपलब्ध करण्यासाठी मदत केली जाणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
वाशिमला तीन हजार तरुणांना रोजगार मिळेल असा प्रकल्प…
विशाखापट्टनम येथे वैद्यकीय साहित्य निर्मिती पार्क तयार करण्यात आला आहे. येथे व्हेंटिलेटरपासून रक्तदाब व इतरही वैद्यकीयचे लहान- मोठे यंत्र तयार केले जात आहे. दरम्यान वाशिमच्या २५ ते ३० तरुणांना विशाखापट्टनम येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. ते उत्तम प्रशिक्षण घेतल्याने या विषयात निपून झाले आहे. तेथेच या तरुणांना नोकरीसाठी संबंधित कंपनीकडून ऑफर दिली गेली आहे. परंतु त्यांना आपण थांबवले आहे. या तरुणांच्या मदतीने वाशिमला एका प्रकल्पावर काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे वाशिमच्या सुमारे ३ हजार तरुणांना रोजगार मिळण्याची आशा असल्याचेही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
आर्थिक मदतीसाठी नागरिकांना आवाहन…
ॲग्रोव्हिजन वास्तूच्या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपये लागणार आहे. त्यासाठी विविध कंपन्यांकडून सामाजिक दायित्व निधीतून पैशाची गरज आहे. त्यांनी येथे मदत केल्यास त्यांना आयकरमधून सुटही मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही नितीन गडकरी यांनी केले.