लकी खानवरील गोळीबारानंतर गुन्हेगारी वर्तुळात हालचाली; गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखेचे तोकडे प्रयत्न

नागपूर : कुख्यात नदीम गुलाम ऊर्फ लकी खान गुलाम नवी शेख रा. बोखारा, कोराडी याच्यावरील  गोळीबारानंतर शहरातील गुन्हेगारी वर्तुळातील वेगाने हालचाली सुरू झाल्या असून टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखेकडून प्रयत्न केले जात असले तरी  त्यातून ठोस काही बाहेर येत नसल्याचे दिसून येत नाही.

२ जुलैच्या रात्री लकी खान  यांच्यावर धरमवीर ऊर्फ धरम ठाकूर याने आपल्या साथीदारांसह मिळून त्याच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनेकांना अटक केली. लकी खान याने वेशभूषा बदलून एकेकाळचा प्रसिद्ध बुकी सुभाष शाहू याला सायनाईट देऊन खून केला होता. त्या प्रकरणी त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. काही महिन्यांपूर्वी तो जामिनावर कारागृहाबाहेर आला आहे.

लकी खान, अब्बास व धरम ठाकूर यांच्यात पैशाचा वाद होता. त्या वादातून हा खुनी हल्ला झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. लकी खान व अब्बास यांच्याविरुद्ध खंडणी मागणे, मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न, खून असे अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते दोघे चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्हयात दारू तस्करी करीत आहेत. लकी खान कारागृहातून बाहेर आल्यापासून त्याने उत्तर नागपूर, मानकापूर व कोराडी परिसरातील गुन्हेगारी वर्तुळातील तरुण हाताशी धरून टोळी तयार केली आहे. या टोळीकडून हप्ता वसुली आणि रिकाम्या भूखंडांवर अवैधपणे कब्जा करणे सुरू केले. त्याला शहरातील गुन्हेगारी वर्तुळावर वर्चस्व निर्माण करायचे आहे. यासंदर्भातील छायाचित्रही त्याच्या फेसबुक पोस्टवर टाकण्यात आले आहेत. तो कारागृहाबाहेर येताच काही दिवसांमध्ये गोळीबाराची घटना घडली. शिवाय लकी खानचे वाढते प्रस्थ बघता इतर भागातील गुन्हेगारी टोळयाही त्याच्याविरुद्ध सक्रिय झाल्या. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा असे टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे.

जामीन रद्द करण्याची गरज

खुनाच्या गुन्ह्य़ात शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्या प्रकरणी जामीन घेऊन तो कारागृहाबाहेर आला व गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी टोळीयुद्ध भडकू नये म्हणून त्याचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जामीन रद्द झाल्यास त्याला कारागृहात जावे लागेल व शहरातील गुन्हेगारीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश येईल.

गोळीबाराच्या घटनेनंतर टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता असेल तर योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच त्याचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

– रवींद्र कदम, सहपोलीस आयुक्त.