-रवींद्र जुनारकर

गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व विद्या शाखा विभागाच्या उन्हाळी परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने (MCQ OMR) ऑफलाईन घेण्याचा निर्णय आज मंगळवारी घेण्यात आला. दरम्यान, एक जून पासून सुरू होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली असून आता १० जूनपासून नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहे. विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठाने आतापर्यंत तीन वेळा निर्णय बदलला आहे. विद्यार्थी संघटनेच्या दबावात हे होत असल्याचं बोललं जात आहे.

काल म्हणजेच सोमवारी २३ मे २०२२ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत परीक्षा प्रचलित पद्धतीने घ्यायची की बहुपर्यायी पद्धतीने घ्यायची याबाबत चर्चा करण्यात आली. बहुपर्याय की प्रचलित याबाबतचा निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यावर सोपविण्यात आले होते. या ऑनलाईन मीटिंगमध्ये परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायची यासाठी विद्या परिषदेच्या सदस्यांमध्ये सरळ सरळ दोन गट पडल्याचं दिसून आलं होतं. आज सकाळी विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रण विभाग प्रमुख डॉ.अनिल चिताडे यांनी एक परिपत्रक काढून परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.

सात दिवसापूर्वी परीक्षा पद्धती बदलल्याने एक जूनपासून सुरू होणारी गोंडवाना विद्यापीठाची परीक्षा स्थगित केली आहे. आता ही परीक्षा १० जूनपासून नवीन वेळापत्रकानुसार होणार आहे. नवीन वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल असेही डॉ. चिताडे यांनी म्हटले आहे. विद्यार्थी संघटनांचा दबाव तथा नागपूर आणि इतर विद्यापीठाने बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने गोंडवाना विद्यपीठाच्या परीक्षाही आता त्याच पद्धतीने होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोंडवाना विद्यापीठाने आधी बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. २२ एप्रिल रोजी विद्यापीठाने तसे पत्रही काढले होते. मात्र सहा दिवसात हा निर्णय फिरवत २८ एप्रिल रोजी प्रचलित पद्धतीने ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. पेपरच्या कालावधी तीन तास ४५ मिनिटं असा ठेवण्यात आला होता. एक जूनपासून परीक्षेला सुरुवात होणार होती. तसे वेळापत्रक पण विद्यापीठाने जाहीर केले. पण आता त्याला स्थगिती दिली. बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्याबद्दल गोंडवाना विद्यापीठवर दबाव वाढला होता.