चंद्रपूर विभागात अव्वल, नागपूर तिसऱ्या स्थानावर
नागपूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा नागपूर विभागाचा निकाल ९९.६२ टक्के इतका लागला आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकालात ८ टक्क्यांनी वाढ झाली असून विभागात चंद्रपूर जिल्याने ९९.८२ टक्क्यांसह प्रथम स्थान पटकावले आहे.
परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकनासाठी ३०-३०-४० हे सूत्र अवलंबण्यात आले. यानुसार दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के व बारावी वर्गाच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित ४० टक्के गुणदान करण्यात आले. शिक्षकांनी २५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन पद्धतीने नोंदवले. मात्र, ग्रामीण भागात मागील वर्षभरापासून कनिष्ठ महाविद्यालये सुरू नव्हती. विशेष म्हणजे, विज्ञान शाखांच्या वर्गामध्ये प्रात्यक्षिक झाले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन कसे करावे असा प्रश्न शिक्षकांसमोर होता. त्याला तोंड देत, प्रत्येक विद्याथ्र्याशी संवाद साधून, त्यांच्याकडून स्वाध्याय घेत, गुणदान करण्यात आले. नागपूर विभागात १ लाख ४० हजार ८५९ नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १ लाख ४० हजार ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये ७० हजार ३ मुले आणि ७० हजार ३२२ मुली आहेत. त्यांची टक्केवारी अनुक्रमे ९९.५१ टक्के, ९९.७२ टक्के इतकी आहेत.
निकालात वाढ तरीही स्थान घसरले
गेल्यावर्षीही निकालात ९ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली होती. त्यानंतरही निकालाची टक्केवारी ९१.६५ इतकी होती. यंदाच्या निकालात ८ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे टक्केवारी ९९.६२ च्या घरात गेली. मात्र, विभाग गेल्या वर्षीच्या पाचव्या स्थानावरून आणखी खाली म्हणजे राज्यात सहाव्या स्थानावर आले.
जिल्हानिहाय निकाल
चंद्रपूर – ९९.८२ टक्के
गडचिरोली – ९९.७३ टक्के
नागपूर – ९९.६१ टक्के
वर्धा – ९९.५९ टक्के
भंडारा – ९९.५४ टक्के
गोंदिया – ९९.३७ टक्के
शाखानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
विज्ञान – ६५,२८१
कला – ४८,९०६
वाणिज्य – १९,६१५
एमसीव्हीसी – ६,५२३