अकोला : २०२३ हे वर्ष विविध खगोलीय घटनांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. अनेक घटना प्रत्यक्ष अनुभवता आल्या. वर्षाच्या शेवटी १३ व १४ डिसेंबरच्या रात्री वर्षातील सर्वात मोठा उल्का वर्षाव राशीचक्रातील मिथुन राशीतून होणार आहे. यावेळी सुमारे १०० ते १२० लहान मोठ्या विविधारंगी प्रकाशरेखा आकाशात उमटतील, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.
निरभ्र रात्री आकाशात एखादी प्रकाशरेखा क्षणार्धात जाते. ती उल्का असते. अनेक उल्का रोजच पडत असतात. विशेषत: धुमकेतू, लघुग्रह, उपग्रह आदी जेव्हा पृथ्वी कक्षेत येतात, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे या वस्तू वातावरणात घर्षणामुळे पेट घेऊन नजरेस पडतात. अपवादात्मक एखादी उल्का पृथ्वीवर अशनी स्वरुपात आढळते. काही उल्का कक्षा आणि पृथ्वी कक्षा निश्चित असल्याने आकाशात ठराविक कालावधीत ठराविक तारका समूहातून उल्कांचा वर्षाव अनुभवता येतो. हा उल्कावर्षाव मिथुन राशीतून होणार आहे. ही राशी रात्री नऊ नंतर पूर्व आकाशात मृग नक्षत्राजवळ बघता येईल.
हेही वाचा : फडणवीस पोहोचले शेगावात…. ‘श्रीं’च्या समाधीस्थळी नतमस्तक
रात्र जसजशी वाढत जाईल, तसतसा उल्का वर्षाव वाढत जाऊन दरताशी सुमारे १०० ते १२० उल्का पडताना दिसणार आहेत. त्यासाठी अधिकाधिक अंधाऱ्या भागातून या विविधरंगी प्रकाश उत्सवात सहभागी होता येईल. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत उल्कांचा वेग वाढलेला असेल. यावेळी आकाशात चंद्र सुद्धा नसेल.