चंद्रपूर : राज्यात मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये व सरकसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊ नये यासाठी चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी २९ सप्टेंबरला मुंबई येथे ओबीसींची बैठक बोलावली आहे. मात्र ही बैठक म्हणजे सरकारधार्जीण्या भाजपाच्या लोकांसोबत होत आहे. ही बैठक डुप्लीकेट ओबीसी लोकांची आहे. या बैठकीला सर्वपक्षीय ओबीसी नेते, ओबीसी आंदोलनात सक्रीय लढा देणाऱ्यांचा समावेश नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व या खात्याचे मंत्री यांचा आम्ही निषेध करतो, या शब्दांत राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी प्रश्नी सरकारवर ताशेरे ओढले.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मागील ११ सप्टेंबरपासून रविंद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सरकार एकीकडे मराठा व धनगर समाजाच्या उपोषणसंदर्भात ज्या पोटतिडकीने सकारात्मकता दाखवित आहे, त्यातुलनेत ओबीसींच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. २९ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे.
हेही वाचा : पावणेदोन लाख विद्यार्थ्यांवर शाळाबाह्य़ होण्याचे संकट!; ‘समूह शाळे’च्या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञांची नाराजी
मात्र या बैठकीला राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून मला निमंत्रण देण्यात तर आले नाहीच पण जे लोक ओबीसींच्या लढ्यात सक्रीय आहेत अश्यांनाही बैठकीपासून दूर ठेवण्यात आले आहे. जे लोक भाजपाचे आहेत, सरकारधार्जीणे आहेत अश्यांनाच बैठकीचे निमंत्रण दिले आहे. याचा आम्ही निषेध करीत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. या बैठकीसाठी सरकारला चार वेळा पत्र काढावे लागत आहे. याचाच अर्थ हे सरकार गोंधळलेले आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक बोलवायला पाहीजे होती, असे मत व्यक्त केले. या बैठकीला भाजपा धार्जिण्या लोकांनी जरूर जावे मात्र ओबीसींच्या लढ्यात खर्या अर्थाने सक्रीय असलेल्यांनी या डुप्लीकेट बैठकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.