नागपूर: संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीवर आहे. कधी नव्हे इतक्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतल्या आहेत. प्रत्येक सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांना लक्ष केले आहे. पवार यांच्यावरील खालच्या पातळीवरील टीका महाराष्ट्रातील जनतेला पसंत पडली नसल्याने त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला ( शरद पवार) होईल, असा विश्वास या पक्षाचे नेते व प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांनी व्यक्त केला आहे.

आर्य हे पक्षाच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये गेले होते. तेथील मतदान आटोपून ते नागपुरात परतले आहे. तेथील निवडणूक स्थितीबाबत त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले प्रधानमंत्री मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना खालची पातळी गाठली. यामुळे पवार यांच्या प्रतिमेवर काहीच परिणाम झाला नाही. कारण महाराष्ट्रातील जनता त्यांना अनेक वर्षांपासून ओळखत आहे. मात्र अशाप्रकारच्या टीकेमुळे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी झाली आहे. याबाबत जनतेच्या मनात संताप आहे. याचे परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना भोगावे लागतील. बारामती मतदारसंघातही हेच चित्र दिसून आले.

हेही वाचा : सत्कारमूर्ती म्हणून मिरवणाऱ्या शेतकऱ्यास चोरी प्रकरणी अटक, कळंब तालुक्यातील शेतमाल चोरी प्रकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम महाराष्ट्रातील एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता भटकती आत्मा अशी टीका केली होती. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटल्या होत्या. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शरद पवार यांच्यावर मोदींनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला होता. त्यापूर्वी भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनीही बारामतीमध्ये आम्हाला शरद पवार यांचा पराभव करायचा आहे, असे सांगितले होते. मतदान झाल्यावर अजित पवार यांनी चंद्रकांतदादा पाटील यांनी असे वक्तव्य करायला नको होते, अशी प्रतिक्रिया दिली होती हे येथे उल्लेखनीय. बारामतीची निवडणूक यंदा विविध कारणांमुळे गाजली. मतदानाच्या दिवशी पैसे वाटप करण्यात आले असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भातील व्हिडिओ एक्स वर टाकून केला होता. सोमवारी ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही काही काळ बंद होते. हा मुद्दा सध्या गाजत आहे.