यवतमाळ : राज्यातील पोलिसांनाच राजकीय प्रशिक्षण देऊन कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा भेदभावपूर्ण राबविली जात आहे. सत्य मांडणाऱ्यांवर अर्बन नक्षलवादी असा ठप्पा लावला जातोय. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत भयावह आहे, असे स्पष्ट मत विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी मांडले.
यवतमाळात येथे आयोजित औपचारिक वार्तालापादरम्यान ते बोलत होते. कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणाच भेदभावपूर्ण वागत असल्याचे सरोदे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह खात्याचे प्रमुख आहे. मात्र, त्यांनी आता पोलिसांना राजकीय प्रशिक्षण देऊन सत्तेचा दुरुपयोग चालविला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलणाऱ्यांचा आवाज दाबायचा, हा प्रकार राज्यात सर्वत्र सुरु असल्याचा आरोप केला. न्यायालयात सरकारविरुध्द लढणाऱ्या वकिलांना सुध्दा अर्बन नक्षलवादी ठरविण्याचे प्रकार सुरु आहे, असे ते म्हणाले.
आज वकिलांमध्येही दोन गट पडले आहे. एक गट कायदा आहे जसा तसा सांगणारा असून, दुसरा गट मात्र, पंतप्रधान मोदींना आवडणारा कायदा सांगतो. त्यांच्या पध्दतीने कायद्याचे अर्थ लावले जात आहे. अलीकडे तर न्यायालयामध्येही विशिष्ट विचारधारेची माणसे बसविली जात असल्याचा गंभीर आरोप सरोदे यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयानेही वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणाबाबत कठोर निर्देश दिले. मात्र, मोठा आवाज ऐकण्याची आम्हाला सवय पडली आहे. एकंदरीत समाजाच्या वाट्याला आलेला हा बहिरेपणा अत्यंत घातक असल्याचेही ते म्हणाले. धार्मिक अस्मितेचा मुलामा चढवून सत्याला दडपण्याचा प्रकार वर्तमान सत्ताधाऱ्यांकडून चालविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आदिवासींच्या जमिनी खनिजांसाठी उद्योगपतींच्या घशात
देशात सर्वत्र अंबानी व अदाणी या उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहे. त्याविरुध्द लढणाऱ्यांना अर्बन नक्षलवादी ठरविले जात असल्याचा आरोप सरोदे यांनी केला. सोनम वांगचूक यांच्या प्रकरणात त्यांच्या वकिलांना अटकेसंदर्भातील कारणेसुध्दा दिली जात नसल्याने, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचेही ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनी भाडेतत्वावर देण्यासंदर्भात महसूल मंत्र्यांनी भाष्य केले. त्यावरील ड्रॉप्ट आतापर्यंत आला नसला तरी या भागातील काही खनिजांच्या साठ्याच्या आडूनच या जमिनी दोन्ही अदानी, अंबानीसारख्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप असीम सरोदे यांनी केला.
विकृत बोलणाऱ्यांमागे मुख्यमंत्र्यांचे डोके
प्रशांत कोरटकरांनी छत्रपती शिवरायांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाष्य केले होते. आज अनेक महिने उलटूनही कोरटकरच्या प्रकरणात चौकशी होत नाही. साधी चार्जशिट दाखल होत नाही. राहूल सोलापूरकर हा अभिनेता महाराजांवर नको ते बोलला, मात्र, अशा मंडळींवर पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोपही सरोंदेनी केला. भाजपातील किरीट सोमय्या, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, शिंदे गटातील संजय गायकवाड ही मंडळी अत्यंत बेताल वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत. ही मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमलेली आहे. एकंदरीत विकृत बोलणाऱ्यांमागे फडणवीसांचे डोके असून तेच अशा हिणकस राजकीय प्रवृत्तीचे जनक असल्याचा आरोप सरोदे यांनी केला.