गडचिरोली : दुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याच्या प्रशासकीय कारभाराची आज राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. ‘आदी कर्मयोगी अभियाना’अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना आज राष्ट्रपती भवनात एका दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासना’च्या पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्रातून हा सन्मान मिळवणारा गडचिरोली हा एकमेव जिल्हा ठरला आहे.

तळागाळातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘आदी कर्मयोगी अभियान’ प्रभावीपणे राबवले. याअंतर्गत ५५३ ‘आदी सेवा केंद्रे’ आणि ग्राम कृती आराखड्यांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेच्या सोयी थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. तसेच, ५ लाख हेक्टरहून अधिक वनजमिनीचे हक्क ग्रामसभांना देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात आले.

“हा पुरस्कार संपूर्ण गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि येथील नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान आहे. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याच्या आमच्या संकल्पाला या पुरस्काराने नवी ऊर्जा मिळाली आहे,” अशी भावना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. जिल्हाधिकारी पंडा यांनी भारत सरकारकडे या यशस्वी प्रशासकीय मॉडेलचे सादरीकरण केले होते. त्यांच्या या कार्याला मिळालेली ही राष्ट्रीय पोचपावती गडचिरोली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.