नागपूर : जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. जुन्नर परिसरात बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने याठिकाणी बिबट सफारी सुरू करण्यासंदर्भात पवार यांचा आग्रह होता. त्यादृष्टीने बैठका घेण्यात येत होत्या. दरम्यान, आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता जुन्नर वनक्षेत्रातील बिबट सफारीचा मार्ग खुला झाला आहे. जुन्नर तालुक्यातील मौजे आंबेगव्हाण वनक्षेत्रात बिबट सफारी उभारण्यास दिलेली मान्यता ही सविस्तर प्रकल्प आराखडा तसेच प्रकल्प आराखडा मांडणी अहवालास नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मान्यतेस अधिन राहून देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ८० कोटी ४३ लाख २३ हजार रुपये खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

हेही वाचा…टिपेश्वर अभयारण्यातील ‘त्या’ वाघाची फासातून सुटका, शिकाऱ्यांनी लावला होता…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन्यप्राणी जवळून पाहण्याची संधी

बिबट सफारीमध्ये पर्यटक व बिबट यांच्या सुरक्षिततेसाठी दुहेरी प्रवेशद्वार तयार करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाप्रमाणे प्रवेशद्वार हे विद्युत स्वयंचलित व सेन्सर असलेले असणार आहे. सफारीमध्ये २.६ किलोमीटर लांबीचा अंतर्गत रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता बिबट, वन्यप्राण्यासाठी तयार केलेले पाणवठे, तसेच, त्यांच्या अधिवासा जवळून जाणार असल्याने पर्यटकांना बिबट वन्यप्राणी जवळून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाप्रमाणे सफारीमध्ये पर्यंटकांना फिरण्यासाठी २० ते २५ आसन क्षमता असलेल्या सुरक्षित तसेच बंदिस्त बस खरेदी कऱण्यात येणार आहेत. सदर बस सफारी मार्गावरुन विहित वेळेत पर्यटकांसह मार्गक्रमण करतील.