लोकसत्ता टीम

वर्धा : आर्वी विधानसभेची जागा भाजप प्रमाणेच काँग्रेस आघाडीसाठी अवघड जागेचे दुखणे ठरत असल्याच्या घडामोडी आहेत. सोमवारी रात्री या जागेबाबत बरीच काथ्याकुट झाल्याची माहिती आहे. आर्वी मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडेच राहील, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार होण्यापूर्वीच अमर काळे यांना स्पष्ट केले होते. त्यामुळे ही जागा आता कोणाला हा प्रश्न उभा असतांनाच राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यात कोणालाही जागा सुटल्यास त्यावर मयुरा काळे यांनाच उमेदवारी मिळावी, अश्या हालचाली आहेत.

मयुरा काळे यांचे मामा असलेल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यास आर्वीच्या काँग्रेस नेत्यांनी विरोध केला. आर्वीतून ईच्छुक पहिल्या तीन नावात शैलेश अग्रवाल, बाळा जगताप, अनंत बाबूजी मोहोड यांची नावे आहेत. मात्र ते डावलून मयुरा काळे यांचे नाव चर्चेत आल्यावर अग्रवाल व मोहोड यांनी त्यास विरोध केला. काळे यांचा पक्षाकडे साधा अर्ज नाही, त्या सदस्य आहेत अथवा नाहीत हे पण निश्चित नाही. मग काँग्रेस यातून काय संदेश देणार, असा प्रश्न या दोघांनी उपस्थित केला.

आणखी वाचा-दलित महिलेवर अन्यायाचे प्रतीक, काँग्रेसची जबरदस्त खेळी, रश्मी बर्वे यांना उमरेडमधून उमेदवारी

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलून आम्ही हे स्पष्ट केल्याचे अग्रवाल हे दिल्लीतून बोलतांना म्हणाले. दुसरे असे की राष्ट्रवादीचा खासदार व त्याच घरात काँग्रेसचा उमेदवार ही त्याची पत्नी, हे कसे चालणार. दुसरा अन्य उमेदवार देऊन काँग्रेस मजबूत करता येईल. खासदारांनी त्यांच्या राष्ट्रवादी कडून पत्नीसाठी तिकीट मागितल्यास, ते एकवेळा समजून घेता येईल. पण एकाच कुटुंबात दोन पक्षाचे नेते कसे ? असा सवाल करण्यात आला आहे. याबाबत वारंवार प्रयत्न करूनही अमर काळे यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या क्षेत्रात राष्ट्रवादीचे अस्तित्व नाममात्रच आहे. हा काँग्रेस पक्षाचाच गड समजल्या जातो. इथून खासदार काळे यांचे वडील डॉ. शरद काळे व नंतर अमर काळे आमदार राहलेत. या लोकसभा निवडणुकीत ऐन वेळेवर ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेली. आणि या जागेवर काँग्रेसचेच अमर काळे यांना पक्षात घेऊन उमेदवार करण्यात आले. काँग्रेसकडे आर्थिक मदत मिळणार नाही तर ती राष्ट्रवादी कडून मिळणार, असा अंदाज ठेवून काळे यांचा निर्णय झाल्याची चर्चा झडली होती. आता दमदार उमेदवार कोण, असा प्रश्न आला आहे.