नागपूर : कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला आणि सुखी संसार सुरु झाला. मात्र, दोन वर्षांतच पतीचे एका तरुणीवर प्रेम जडले. लग्न न केल्यास पोलिसांत तक्रार देण्याची धमकी प्रेयसीने दिली. त्याने पत्नीकडे प्रेमप्रकरण आणि प्रेयसीच्या धमकीची कबुली दिली. संसार विस्कळीत होण्याच्या मार्गावर असताना हे प्रकरण भरोसा सेलमध्ये पोहचले. पोलिसांनी पत्नी-पत्नी आणि प्रेयसीचे समूपदेशन करुन विचित्र प्रेमकथेची ‘हॅपी एंडिंग’ केली.

यशोधरानगरात राहणारा आशिष हा मित्रांच्या संगतीत शिक्षण सोडून गुन्हेगारीकडे वळला. त्यामुळे कुटुंबियांनीही त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. यादरम्यान त्याने वस्तीत राहणाऱ्या तनुजा (काल्पनिक नाव) हिच्याशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण कुटुंबियांना लागली. त्यांनी आशिषचा नाद सोडबाबत तनुजाला समज दिली. मात्र, तनुजा आशिषच्या प्रेमात वेडी झाली होती. त्यामुळे दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पळून जाऊन लग्न केले. दोघांचा सुरळीत संसार सुरु होता. तनुजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर कुटुंबियांनी दोघांनाही स्विकारले. तनुजा बाळासह माहेरी गेल्यानंतर आशिषचे वस्तीत राहणाऱ्या स्विटी (काल्पनिक नाव) या तरुणी सूत जुळले. दोघांचे जवळपास सहा महिने प्रेमप्रकरण फुलले.

स्विटीने गर्भवती असल्याचे सांगून आशिषला लग्नाचा तगादा लावला. लग्न न केल्यास पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली. त्यामुळे विवाहित असलेला आशिष संभ्रमात पडला. त्याने पत्नीकडे संकटात सापडल्याचे सांगून कबुली दिली. पत्नीने पतीच्या प्रेयसीला फोन केला आणि घरी बोलावले. पतीच्या प्रेयसीला गर्भपात न करता पतीसोबत राहून बाळाला जन्म देण्याची तयारी दर्शविली. स्विटीनेही होकार दिला. परंतु, पत्नीला स्विटीच्या वागणुकीवर संशय आला. तिने डॉक्टरांकडे जाऊन तिची वैद्यकीय तपासणी केली. ती गर्भवती नसल्याचे स्पष्ट होताच तिला चांगला चोप दिला. तरीही ती लग्न करण्याचा हट्ट धरुन बसली.

भरोसा सेलमध्ये पोहचले प्रकरण

स्विटीने लग्न करण्याचा आशिषकडे तगादा लावला. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आशिष लग्नासाठी तयार झाला. एकाच घरात पहिल्या पत्नीसह राहण्यास स्विटी तयार झाली. परंतु, पत्नी तनुजाने लग्नास विरोध दर्शविला. विचित्र स्थिती निर्माण झाल्यामुळे तनुजाने भरोसा सेल गाठले. पती व स्विटीची लेखी तक्रार केली.

पोलिसांनी सोडवला गुंता

भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे आणि समूपदेशक जोशी यांनी तिघांचीही मानसिकता समजून घेतली. स्विटी आणि आशिषला बोलावून घेतले. तनुजाला आठ महिन्यांचा मुलगा आणि तीन महिन्यांची पुन्हा गर्भवती असल्याची बाब स्विटीला समजून सांगण्यात आली. आशिषला गुन्हेगारी प्रवृती सोडून व्यवसायाकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले. स्विटीने आशिषचा नाद सोडून आपल्या नातेवाईक युवकाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे पोलिसांनी प्रेमाच्या त्रिकोणातील गुंता सोडवला.