नागपूर : पावसाळ्यात वादळ आणि गारपिटीचा अंदाज ‘डॉप्लर वेदर रडार’ या यंत्रणेच्या माध्यमातून दिला जातो. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून ही यंत्रणाच बंद पडलेली आहे. यापूर्वीही अनेकदा ही यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात कोट्यावधी रुपये खचून लावण्यात आलेली चिनी बनावटीची ही यंत्रणा पांढरा हत्ती तर ठरणार नाही ना, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
चिनी बनावटीची ‘डॉप्लर वेदर रडार’ ही यंत्रणा शहरात फेब्रुवारी २०११ मध्ये स्थापित करण्यात आली. मात्र, बदलत्या हवामानाचे आणि धोक्याचे संकेत देणारी ही यंत्रणा उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसातच बंद झाली. त्यावेळी देखभाल दुरुस्तीचे कंत्राट न दिल्याने वर्षभर ही यंत्रणा बंदच होती. तर आता कंत्राट देऊनही त्यात वारंवार बिघाड होत आहे. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये ही यंत्रणा बंद झाली होती.
तर आता पुन्हा एकदा भर पावसाळ्यात ते बंद झाले आहे. २०१९ मध्ये मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी ही यंत्रणा एकाचवेळी बंद झाली. नागपुरात भर पावसाळ्यात एकाच महिन्यात दोनदा यंत्रणा बंद झाली. २०१४ साली ऐन गारपिटीच्यावेळी हे रडार बंद होते. २०१७ मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
मुंबईचे रडार पुण्यापर्यंत काम करते, पण नागपूरची यंत्रणा ही मध्यभारतातील एकमेव यंत्रणा असूनदेखील ती योग्यरित्या काम करत नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रादेशिक हवामान खात्याकडे विचारणा केली असता तांत्रिक अडचणी येतच असतात. रडारमधील ‘टेक्निकल बोर्ड’ खराब झाला आहे आणि दिल्लीवरुन तो मागवण्यात आला आहे. त्यामुळे एक-दोन दिवसात यंत्रणा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार हे रडार चिनी बनावटीचे असल्याने दिल्लीत देखील त्याचे सुटे भाग मिळणे कठीण आहे. त्याठिकाणी ते तयार होत नाही. त्यामुळे हे सुटे भाग चीन मधूनच मागवावे लागतात. भारतीय बनावटीच्या रडारमध्ये अशी समस्या उद्भवणे फार क्वचित होते आणि झाले तरी भारतातच त्याचे सुटे भाग मिळत असल्याने त्वरीत दुरुस्ती देखील करता येते.
रडार हे काही मिनिटांच्या मध्यंतरात ३६० अंशामध्ये फिरते. नागपूरपासून जवळपास २५० किलोमीटरमध्ये काय चालले आहे याची माहिती रडारच्या माध्यमातून मिळते. म्हणजेच कुठे ढग आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, ज्यांची उंची किती, किती पाऊस चालला आहे, कुठे गारपीट होत आहे, पाऊस वादळी आहे की नाही, ढग कोणत्या दिशेला चालले याची सर्व बातमी रडारमधून मिळते. उपग्रह देखील ही माहिती देतात, पण रडारइतकी अचुकता त्यात नाही.