नागपूर : मोसमी पावसाचा प्रवास सुरू होण्यापूर्वी “नवतपा” येतो. यावर्षी मात्र हवामानाचे गणित जास्तच पालटले आहे. नवतपाच्या कालावधीत तापमानाचा पारा टोकाला पोहचलेला असतो. मात्र यावेळी नवतपाच्या कालावधीत चक्क पाऊस पडला आणि आता मोसमी पाऊस अपेक्षित असतांना तापमानाचा पारा मात्र ४४ अंश सेल्सिअस पलीकडे गेला आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअस पलीकडे गेले आहे. तर त्याचवेळी दुपारनंतर कधीतरी वादळीवारा सुटून हलकी पावसाची सर येत आहे. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा आहे आणि नागरिक देखील त्रस्त झाले आहेत.

उपराजधानीत सलग दुसऱ्या दिवशी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. रविवारी शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअस असताना, सोमवारी तब्बल १.२ अंश सेल्सिअसने त्यात वाढ होऊन ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शहरात करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण विदर्भात नागपूर शहर सर्वाधिक उष्ण ठरले.

शहरात अजूनही मोसमी पावसाने प्रवेश केलेला नाही. मात्र, अधूनमधून पडणाऱ्या पावसाने उकाड्यात मात्र वाढ झाली आहे. सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. नागपूर शहरच नाही तर संपूर्ण विदर्भ तीव्र उष्णतेच्या विळख्यात आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. साधारणपणे जून महिन्यात नागपूर शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहते. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अधूनमधून पावसाची एखादी सर येऊन जात असली तरीही त्यामुळे तापमान कमी झालेले नाही. याउलट उकाड्यात मात्र वाढ झाली आहे. सोमवारी तापमानाने या हंगामातील एक नवीन विक्रम केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिलमध्ये शहरात तापमान वाढ झाली हाेती, पण आता मोसमी पावसाची अपेक्षा असताना तापमान ४४ अंश सेल्सिअसवर गेले आहे. दूपारी चार वाजताच्या सुमारास मात्र वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर मात्र पुन्हा उन्ह तापले. दरम्यान शहरात १५ जूननंतरच मोसमी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान अभ्यासकांनी दिला आहे. सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनचा अजिबात नाही. आणि मान्सूनची चिन्हे सध्यातरी नाहीत. कारण मान्सून असता तर पाऊस पश्चिम किंवा दक्षिणपश्चिम कडून आला असता. त्यामुळे मान्सूनची प्रतिक्षाच करावी लागणार आहे.