नागपूर : कर्जामुळे त्रस्त नैराश्यातून दोन दिवसांपूर्वी घराबाहेर पडलेल्या एका तरुणाने सोमवारी दुपारी पोलिसांच्या देखत मौदा परिसरातील कन्हान नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तत्परता दाखवत वाडी पोलिसांनी नदी पात्रातून त्याला सुखरूप बाहेर काढत प्राण वाचविले. पंकज राजेंद्र खोब्रागडे (३३) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
वाडी पोलिस ठाण्याचे एएसआय विनोद कांबळे यांच्या सतर्कतेमुळे पंकज हा पोहणाऱ्यांच्या मदतीने बचावला. वडिलांशी झालेल्या वादानंतर पंकज दोन दिवसांपूर्वी कार घेऊन घराबाहेर पडला. आधी तो फुटाळा तलावात आत्महत्येच्या विचारात होता. पण एन वेळी त्याने विचार बदलला आणि गाडी घेऊन घरी परतला. घरात काही वेळ घालविल्यानंतर पंकज पुन्हा कार घेऊन मौदा येथे पोहोचला. त्याने कारमध्ये रात्र काढली. पंकजने आपला फोन बंद करून ठेवल्याने त्याची पत्नी, आई- वडील सगळेत काळजीत होते.
दोन दिवसांनी फोन सुरू केल्यानंतर पंकजने पत्नीशी संपर्क साधला. तो आईशीही बोलला. त्याने आईला वाट पाहू नको, मी परतणार नाही, असे सांगत पुन्हा फोन बंद केला. आईने पंकजशी झालेले बोलणे वडिलांना सांगितले. वडिलांनी लगेच वाडीचे सहाय्य उपनिरीक्षक विनोद कांबळे यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत कांबळे यांनी लोकेशन शोधले. पंकज मौदा परिसरात असल्याचे निदर्शनास आले.
तत्पूर्वी पोलीस पंकजच्या पत्नीशी संपर्कात होते. त्यांनी लोकेशनवर पोहचेपर्यंत पंकजशी बोलत रहा असे त्यांना सांगितले. पोलीस जेव्हा पुलावर पोचले तेव्हा पंकजची कार तिथे उभी होती. पोलीसांना पाहून त्याने नदीत उडी घेतली. स्थानिकांच्या मदतीने त्याला अखेर नदीतून बाहेर काढण्यात आले. वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी पंकजचे समुपदेशन करून त्याला कुटुंबाकडे सोपविले.
जेसीबीमुळे कर्जाचा ताण
पंकजचा वाडीत गादी कारखाना आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने १२ लाखांचा जेसीबी खरेदी केला. त्याला दरमहा ३५ हजार रुपये हप्ता भरावा लागत होता. जेसीबीचे काम थांबल्यापासून हप्ता थकल्याने त्याचा दोन दिवसांपूर्वी वडीलांशीही वाद झाला होता.