वर्धा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही खरे नाही. कार्यकर्ते दिवाळीत लागले असताना दुसरीकडे नेते मात्र फटाके लावण्याचे कार्य जोमात करीत असल्याच्या घडामोडी घडत आहे. खासदार अमर काळे व माजी मंत्री अनिल देशमुख आता हेच पक्षाचे विदर्भातील सूत्रधार अशी पक्षाची वाटचाल एका घटनेने दिसून आली.
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी हिंगणघाटचे अतुल वांदिले यांची निवड झाली. ही एवढी अकस्मात की दुसरा गट धक्का खाऊन गेला. आम्हाला न विचारता असा निर्णय झालाच कसा, असा प्रश्न बलाढ्य सहकार गट विचारत असून सर्व संतप्त आहेत. या अनुषंगाने आज सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष नेतृत्वावर वार केलेत.
ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन होण्यापूर्वीपासून आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत. पक्षास मान्यता मिळावी म्हणून तयारी नसताना निवडणुकीस उभे झालो. पक्षाने सांगायचे व आम्ही निमूट जबाबदारी पार पाडायची, असे २७ वर्षापासून चालत आले. आता पक्षाचा पडतीचा काळ असूनही आम्ही सोबतच.
मात्र काहींनी दगाबाजी केली. राष्ट्रवादी स्थापनेवेळी जे कोणत्या पक्षात होते, हे ते सुद्धा सांगू शकणार नाही अशी मंडळी आता निर्णय घेत आहे. वांदिले यांना जिल्हाध्यक्ष करताना आम्हास विश्वासात न घेणारे दोघेच. एक म्हणजे माजी मंत्री अनिल देशमुख व दुसरे खासदार अमर काळे. पहिले लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांनी मनमानीपणे एकट्याने निर्णय घेतले. त्यावेळी आम्ही गटासाठी तिकीट मागितले होते. पण आयात उमेदवार आमच्या मस्तकी मारला. आता जिल्हाध्यक्षपद परस्पर जाहीर केले. हे कसे खपवून घेणार ? असा संतप्त सवाल प्रा. देशमुख यांनी केला.
या जिल्ह्यात प्रत्येक गावात दोन गोष्टी हमखास आहेत. एक पोस्टाचा डब्बा व दुसरा म्हणजे सहकार गटाचा कार्यकर्ता. आम्हास गृहीत धरून व शरद पवार यांना नं सांगता कारभार होत असेल तर खपवून घेणार नाही. कार्यकर्ते म्हणतात उपरे जिल्ह्यात कारभार करीत असतील तर सोडा पक्ष. आम्ही आता निर्णयाक भूमिका दिवाळी नंतर घेऊ. एका तालुक्यापुरता पक्ष मर्यादित करणाऱ्यांनी रिझल्ट दाखवून द्यावे. आम्ही आमची तयारी करणार, असे देशमुख म्हणाले.